उंच आड

उंच आड

खानदेशातील नशिराबादमध्ये खानदेशी वैशिष्ट्ये अनुभवायला मिळतातच, पण या छोट्याशा गावाचे स्वतःचेही वैशिष्ट्य आहे. उंच आड, झिपुअण्णा, बालुमिया अशा स्थानांनी हे गाव वेगळे ठरते आहे.

जळगाव-भुसावळ राज्य महामार्गालगत वसलेले नशिराबाद. गाव तसे छोटेसे, पण सुंदर. जळगाव व भुसावळ ही दोन्ही शहरे जवळ असल्यामुळे येथे शहरी तसेच ग्रामीण दोन्ही प्रकारच्या वातावरणाचा एकत्रित आनंद अनुभवयास मिळतो. गावातून तीन हमरस्ते गेल्यामुळे गाव तीन विभागात विभागले गेले आहे. वरची आळी, खालची आळी व मधली आळी. जळगाव हे जिल्ह्याचे शहर, तर भुसावळ तालुक्‍याचे ठिकाण असल्यामुळे उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने गाव फारसे विकसित नाही. बहुतांश ग्रामस्थ आपली पूर्वापार चालत आलेली शेती करतात. त्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय. गावात हिंदू-मुस्लिम एकोप्याने नांदतात, म्हणून गावाचा रामरगाडा ग्रामपंचायती मार्फत चांगला चालतो. जळगाव, भुसावळहून सुटणाऱ्या, तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व एसटी बसेस येथे थांबतात.

एसटी स्टॅंडवर उतरून आपण मधल्या आळीत प्रवेश करतो. गावात प्रवेश करताच गावपण नजरेत भरते. एसटी स्टॅंड ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतच्या भागास मधली आळी म्हणून संबोधले जाते. या रस्त्याच्या दुतर्फा मशिद, श्रीहनुमंताचे मंदिर, कापड दुकाने, भांड्याची दुकाने, किराणा दुकान, शिवणकाम करणारे, तसेच बॅंडवाले अशांकडून आपले स्वागत होते. मध्येच जीर्णावस्थेतील, परंतु वास्तव्यास योग्य असे मोठे वाडे तग धरून दणकटपणे उभे आहेत. आम्ही अजूनही चिरतरूण असल्याचे दिमाखाने सांगत आहेत. गावात फेरफटका मारताना गावकऱ्यांकडून "उंच आड' हा शब्द अनेक वेळा कानी आला. आड अर्थात पाण्याची विहीर. आजपर्यंत ग्रामीण भागात गेल्यावर मोठा आड, लहान आड, खालचा आड तर काही ठिकाणी नावानिशी अमक्‍याचा आड, तमक्‍याचा आड अशी अनेक नावे ऐकली. परंतु "उंच आड' या शब्दाने तो आड पाहण्याचे कुतूहल निर्माण झाले. त्याविषयी जाणून घेण्याची उत्कंठा झाली व तिकडे गेलो.

वयाची 86 वर्षे उलटलेले पी. पा. राणे यांची भेट झाली. या उंच आडाविषयी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ""हा सर्वांत जुना शंभर वर्षांपूर्वीचा जळगाव जिल्ह्यातील एकमेव आड ज्याचे पाणी 1952 मधला दुष्काळ वगळता एकदाही आटलेला नाही. दुष्काळानंतर या आडातील पाण्याचे झरे पुन्हा जीवित झाले. आजमितीपर्यंत याला भरपूर पाणी आहे. सर्व गावाची तहान भागविण्यास हा समर्थ आहे.

मध्यंतरीच्या काळात याचे पाणी रस्त्यावर वाहून जाण्याइतपत वाढले होते. वाढलेले पाणी वाहून जाऊ नये म्हणून याचे काठ उंच भिंती घालून उंचावण्यात आले. तेव्हापासून याला व या भागासही "उंच आड' असे म्हटले जाऊ लागले. याचे पाणी गोड व पिण्यास योग्य आहे. पूर्वीच्या काळी यातील पाणी दोराने सेंधले जायचे. त्या दोरांच्या खुणा आजही विहिरीच्या आतील बाजूस पाहायला मिळतात. आता रहाटाची जागा विजेच्या पंपाने घेतली. आडाभोवती सुंदर, छानसा गोलाकार दगडी चौथरा बांधला असून, एका कोपऱ्यात पाणी भरण्यासाठी नळ बसविला आहे. याची देखभाल व स्वच्छता सर्व गावकरी करतात. बाळ जन्मास आले, की त्याचे पाण्यापासून संरक्षण व्हावे व त्याची पाण्याबद्दलची भीती दूर व्हावी म्हणून बालपणीच बालकासह पूजा करण्याची प्रथा आहे. यास "आसऱ्याची पूजा' म्हटली जाते. हा विधी पण या उंच आडाजवळ पूर्ण केला जातो.

नशिराबाद या गावाचे पूर्वीचे नाव सोडनिंभोरा. या गावाचा सरदार नसिरखान वरुन नशिराबाद असे नामकरण झाले. नसिरखान सरदाराची गढी नदीकिनारी होती. या गावास तटबंदी होती व सोळा दरवाजे होते. कालांतराने सर्व तटबंदी तुटली. परंतु गावाच्या एका टोकास आठवडे बाजाराजवळ याचे उरलेले अवशेष साक्ष देतात. पूर्वी गावाचा परगणा महाराष्ट्रात नंदुरबार, तर मध्य प्रदेशात बऱ्हाणपूरपर्यंत असल्याचे सांगितले जाते. या गावाला ऐतिहासिक तसेच आध्यात्मिक वारसा लाभला आहे. गावात मधल्या आळीत ग्रामपंचायतीच्या ऑफिसजवळ सिद्धपुरुष झिपुअण्णा यांची समाधी व मंदिर आहे. या भागाला झिपुअण्णानगर म्हटले जाते. झिपुअण्णाना योगाची उच्च अवस्था प्राप्त झाली होती. ते परम अवधूत शिरोरत्न होते. असे सांगितले जाते, की वैशाखातील रणरणत्या उन्हात त्यांच्या अंत्ययात्रेत चालत असताना पायास चटके लागत होते. अशा वेळी आकाशात ढग नसताना वरुण राजाने वर्षा केली व अंत्ययात्रेचा मार्ग शांत केला. वाकी नदीकाठी छोट्याशा टेकडीवर असलेले बालुमिया हे श्रद्धास्थान आहे. येथे जिवंत पाण्याचा झरा आहे. या झऱ्यातील पाणी प्राशन केल्यास आजार बरे होतात अशी धारणा आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत गावात गल्लोगल्ली महिला एकत्रित होऊन सहकारी वृत्तीने एकमेकांच्या मदतीने चिकाचे पापड, खिशीचे पापड, बिबडे, कुर्ड्या बनवतात. साहित्याची देवाण घेवाण करताना सहजतः अहिराणी भाषेत "घे वं बहिणा, दे वं बहिणा' असा भावनात्मक साद देत बहिणीचे नाते जोडले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com