स्वच्छता कामगार आणि स्वच्छ भारतासाठी...

प्रा. प्रवीण जाधव
रविवार, 14 मे 2017

कचरा उठाव करणाऱ्या कामगारांमुळे आपला परिसर आणि शहर स्वच्छ राहते. त्यांच्यासाठी चांगली आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

कचरा उठाव करणाऱ्या कामगारांमुळे आपला परिसर आणि शहर स्वच्छ राहते. त्यांच्यासाठी चांगली आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

जुन्या काळात आपल्या देशात कचऱ्याची समस्या फक्त शहरांपुरतीच मर्यादित होती. परंतु जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर ग्रामीण भागही झपाट्याने विकसित होऊ लागला. या विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्याचे दुष्परिणामही दिसू लागले. आर्थिक सुबत्ता, वाढलेली खरेदीक्षमता यामुळे उत्पादकता प्रचंड प्रमाणात वाढली. या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. विसाव्या शतकातील शेवटच्या दशकामध्ये वाढलेल्या या उत्पादकतेमध्ये प्लास्टिकचा कचरा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला. प्लास्टिकच्या कचऱ्यातून पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या हेतूने अनिता आहुजा यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले.

अनिता आहुजा यांच्या वडिलांनी भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ब्रिटनमधून लढा दिला होता. त्यांच्या विचारांचा अनितांच्या आयुष्यावर खूप प्रभाव पडला. आपल्या घरामध्ये असणारा देशभक्तीचा वारसा पुढेही सुरू ठेवण्याची अनिता यांची पहिल्यापासूनच इच्छा होती. त्यामुळेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केले. त्यानंतर अनिता यांनी आधुनिक भारतातील हिंदू-मुस्लिम संबंधांवर एक पुस्तक लिहिले. अनिता ज्यावेळी दिल्लीजवळील उपनगरामध्ये राहत होत्या, त्यावेळी त्यांनी परिसरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी विचार सुरू केला. त्या परिसरातील सुमारे पाचशे घरांतील स्वयंपाकघरामध्ये साठणारा कचरा एकत्रित करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याच्या प्रकल्पावर त्यांनी काम सुरू केले. या प्रकल्पावर काम करताना बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम त्यांच्या लक्षात येऊ लागले. प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास त्यांच्या लक्षात आला. आपल्या देशात जो कचरा निर्माण होतो तो गोळा करणं, त्याचं नियोजन करणं आणि त्याची विल्हेवाट लावणं हे आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहे. २००७ च्या अभ्यासानुसार मोठमोठ्या शहरांमध्ये कचऱ्याची ही समस्या उग्र रूप धारण करीत आहे. देशात सर्वात जास्त घनकचरा हा दिल्ली शहरामध्ये होतो. या कचऱ्याचे वजन अंदाजे चार हजार टन इतके होते. या एकूण कचऱ्यापैकी अंदाजे पंधरा टक्के कचरा हा प्लास्टिकच्या स्वरूपात असतो. या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे शहरातील गटारे आणि ड्रेनेज तुंबतात. तसेच नद्यांमध्ये कचरा साठून पाणी अशुद्ध व्हायचे.

महानगरपालिकेने गोळा केलेला कचरा चांगल्या पद्धतीने निर्गत करूनही प्रत्येक दहा वर्षांनी कचरा टाकण्यासाठी नवीन जागा शोधावी लागायची. कचरा उठाव करण्यासाठी कंत्राटदार कामगार नियुक्त करत त्यांना धोकादायक स्थितीत काम करूनही अतिशय कमी पगार असायचा. अशा प्रकारे कचरा उठाव करणारे कामगार अतिशय महत्त्वाचे काम करायचे, परंतु त्यांची सातत्याने पिळवणूक आणि शोषण व्हायचे. इतक्‍या कमी पगारात काम करणारे लोक झोपडपट्टीमध्येच रहात असत. त्यांच्या झोपड्या विकास प्रकल्पांसाठी सतत तोडल्या जायच्या. कचरा उठाव करणारे स्वच्छता कामगार आहेत म्हणून ही कामे चांगल्या प्रकारे होतात. एकट्या दिल्ली शहरामध्ये त्या काळी स्वच्छता कामगारांची संख्या ऐंशी हजारांच्यावर गेलेली होती. यापैकी बहुतांश लोक हे ग्रामीण भागातून आणि बांगलादेशातून आलेले स्थलांतरित असायचे. हे कामगार अल्पशिक्षित तर असायचेच, परंतु यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे विशेष कौशल्य नसायचे. त्यामुळे त्यांच्याकडे उत्पन्नवाढीचा दुसरा कोणताही सक्षम पर्याय उपलब्ध नसायचा. समाजातील अतिशय शेवटचा घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कामगारांना विकासात्मक धोरणे ठरविताना विचारात घेतलेच जायचे नाही. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे भारतीय पारंपरिक जात-धर्माची उतरंड त्यांचे खच्चीकरण करायची. अनिता यांनी या सर्व परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. या स्वच्छता कामगारांसाठी चांगले काहीतरी करायला हवे या हेतूने त्यांनी काम सुरू केले. त्यांनी कन्झर्व्ह इंडिया या संस्थेची स्थापना केली.

अनिता यांनी पहिल्यांदा दोन महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले. पहिली बाब म्हणजे दिल्लीतील प्लास्टिकचा कचरा आणि दुसरी म्हणजे याठिकाणी काम करणारे स्वच्छता कामगार. त्यांच्या संस्थेने या स्वच्छता कामगारांना नियमित उत्पन्नाची हमी दिली आणि खराब झालेल्या प्लास्टिकमधून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू उत्पादित करण्याचे काम सुरू केले. हे कामगार कचरा गोळा करता करता त्यातील खराब प्लास्टिक वेगळे करत. त्यानंतर त्या खराब प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचे मोठमोठे पुठ्ठे तयार केले जात. त्यातून प्लास्टिकच्या बॅग तयार केल्या जातात. अनिता यांनी या मॉडेलचे पेटंटही घेतले आहे. वेगवेगळ्या डिझाइन, पेंटिंग आणि रंगांच्या या बॅगा अतिशय टिकाऊ असल्यामुळे अल्पावधीत या लोकप्रिय झाल्या. प्रत्येक बॅग ही वेगळी आणि एकमेव बनते. अनिता यांनी स्वच्छता कामगार आणि तंत्रज्ञान या दोन्हींचा वापर करून त्याद्वारे व्यावसायिक उत्पादने बनविण्यास सुरुवात केली. अनिता यांनी तयार केलेल्या या बॅगा सुरुवातीला युरोपियन देशांमध्ये विक्री केल्या. त्याठिकाणी मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अनिता यांनी या बॅगा भारतातील बाजारपेठेत विकायला सुरू केल्या. याठिकाणीही फॅशन आणि आकर्षकपणामुळे या बॅगा ग्राहकांना आवडू लागल्या. या बॅगांबरोबर अनिता यांनी फाइल फोल्डर, शू रॅक, स्टोअरेज बॉक्‍स, टेबलमेट आणि याप्रकारच्या वस्तूंचे उत्पादन सुरू केले. अनिता यांच्या कंपनीने सुरुवातीलाच महिन्याला चार हजार बॅगांची विक्री करून पहिल्याच वर्षी दोन कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले. अनिता यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब महिलांना कचरा उठावाच्या कामासाठी नियुक्त केले. त्यांना चांगला पगार दिला. त्यांना सुरक्षा, ओळख आणि सन्मान या संस्थेमुळे मिळाला. अनिता यांनी या कामगारांनी वेगवेगळी कौशल्ये शिकावीत यासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. कचरा गोळा करणाऱ्या कामगारांमध्ये अनिता यांनी चांगले आचार-विचार याबरोबर उदरनिर्वाहाचे चांगले माध्यम विकसित केले आहे. कन्झर्व्ह इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कचरा गोळा करणाऱ्या लोकांचा विकास कसा होईल, याकडे अनितांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.