रेल्वेतील प्रवासाच्या गमती

सुनीता कदम
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

रेल्वेतून प्रवास करण्यात गंमत असते. मस्त चहा पीत रेलून बसायचे. गप्पांचे फड जमवायचे. खिडकीतून दिसेल तेवढा परिसर न्याहाळायचा. प्रत्येक टप्प्यावर नवी संस्कृती भेटत राहते, ती अनुभवायची.

रेल्वेतून प्रवास करण्यात गंमत असते. मस्त चहा पीत रेलून बसायचे. गप्पांचे फड जमवायचे. खिडकीतून दिसेल तेवढा परिसर न्याहाळायचा. प्रत्येक टप्प्यावर नवी संस्कृती भेटत राहते, ती अनुभवायची.

निवृत्तीनंतर पर्यटनाची लॉटरी लागली. वर्षातून दोन-दोन सहली झाल्या. पहिली सहल होती काश्‍मीरची. बरोबर मुलीच्या सासूबाई. रेल्वेने आम्ही निघालो. त्या डब्यात आम्ही दोघीच स्त्रिया, बाकी सर्व पुरुष. दिल्ली जवळ आली, तसे कुठल्या तरी स्टेशनवर डब्याचे दरवाजे धाड धाड वाजू लागले. दरवाजा उघडला तसा एक सरदारजी आतमध्ये आला. मोठमोठ्याने ओरडू लागला, "मैं निर्मलसिंग हूँ। मैं सुभेदार हूँ। मेजर हूँ। एकेक को बताऊंगा.' आम्ही खूपच घाबरलो. रात्र असल्यामुळे त्याच्याबरोबर कोण होते, ते कळलेच नाही. आम्ही दोघी एका बाकड्यावर सरकून बसलो. रात्र संपली आणि सकाळी बघते तर काय हा पठ्ठा एका सीटवर, याची बायको एका सीटवर आणि एका सीटवर दोन लहान मुले. सकाळी अगदी शांत होता. दोन तास झाले तरी हा गप्पच. मग मी त्याला विचारले, ""भैया रात को क्‍या हुआ था?'' तो म्हणाला, ""इस गाडीमे मैंने रिझर्व्हेशन किया था । यह गाडी चली जाती तो, दरवाजा कोई खोलही नही रहा था।'' दोन दिवस त्याच्या लहान मुलांबरोबर छान गेले. काही काळजी नव्हती. योगायोग असा, की मी लग्नानंतर ज्या लष्करी छावणीत राहत होते, त्याच छावणीत तो राहत होता.

नेपाळला निघाले. प्रवास सुरू झाला. दिल्लीला एक पंजाबी मुलगा बसला. गाडी सुरू झाल्याबरोबर, तो मस्त पंजाबी भाषेत त्याच्या दुकानातल्या लोकांना मोठमोठ्याने सूचना देत होता. पंजाबी भाषा ऐकायला छान वाटत होती. झाले, त्याचा मोबाईल काही बंद होईना, त्याचे बोलणे काही संपेना. रात्रीचे नऊ वाजले, शेवटी न राहवून त्याला मी म्हटले, ""भैया, अब तेरा दुकान बंद कर देना, नींद आ रही है।'' त्याने ऐकले. सकाळी दहा वाजता उठला. मी न राहवून त्याला विचारले, ""तेरा दुकान अभी तक शुरू नही हुआ? '' बिचारा गप्प बसला.

रेल्वेतून उतरून आता लक्‍झरी बसमधून आम्ही निघालो होतो. सोरटी सोमनाथचे मंदिर बघायचे होते. त्या वेळेस सोबत माझा प्रिय भाऊ होता. मला झोपायचा आजार होता. एका क्षणात मला झोप लागायची, ती फक्त पाच मिनिटे. सर्व लोक बसमधून उतरले आणि मंदिराकडे निघाले, मी एकटीच राहिले. भावाने उठविण्याची तसदी घेतली नाही. मोठ्या मुश्‍किलीने डोळे उघडून बघते तर काय गाडी रिकामी, गाडीत एकटीच. मी उतरून एकटीच दर्शन घेऊन आले. भावाला विचारले, ""काय रे मला उठविले नाहीस,'' तर तो मला म्हणाला, ""तू गाढ झोपली होतीस.''

पंजाबला गेले होते. सुवर्णमंदिर पाहिले; पण बरोबरची मंडळी दिसेना. भाऊ तर आमचा कधीच गायब झाला होता. रात्र झाली. एकटी सायकलरिक्षाने हॉटेलला निघाले. रिक्षावाला मुलगा, जवळचे अंतर असूनही लांबच्या रस्त्याने नेऊ लागला. मी म्हटले, ""इतने दूर से क्‍यू लेके जा रहे हो? हॉटेल तो नजदीक है।'' मग व्यवस्थित जवळच्या रस्त्याने नेले. हॉटेलच्या अगदी दारात नेऊन सोडले. मी त्याला शंभर रुपये दिले व त्याच्या पाया पडले. देवमाणूस म्हणायचा तो. त्या वेळी रात्रीचे बारा वाजले होते.
आणखीन एक प्रसंग घडला नैनीतालहून येताना. सर्व प्रवास सुखाचा चालला होता. गप्पागोष्टींमध्ये वेळ कसा गेला होता, कळलेच नाही. आमच्या डब्यात एक ज्येष्ठ जोडपे बसले होते, छत्तीसगडचे. आम्ही पुण्याला येत होतो. म्हातारा-म्हातारीचे चेहरे थोडे उतरलेलेच होते. विशेष काही बोलत नव्हते. मी त्यांना जेवण करा म्हटले, माझ्याकडील गोड पदार्थ दिले, कसेतरी खाल्ले. एवढ्यात मागच्या जागेवरून एक गुबगुबीत मुलगा आला. त्यांची झटापट सुरू झाली. डब्यात कुणाला काहीच कळेना. हा काय प्रकार आहे. तो मुलगा त्या दोघांना ढकलू लागला. आम्हाला वाटले, जागेवरून चालले असेल. ते दोघे म्हणाले, ""बेटा है हमारा, पुना में नौकरी मिली है।'' तो मुलगा एकसारखा आईवडिलांना ढकलू लागला, ""मै नही आऊंगा पुना मे। मेरे माता पिताजी नरकमे जायेंगे। मुझे जबरदस्ती लेके आ रहे है।'' समोर बसलेली मुले हसू लागली. ""देखो इतना पढा है, बडी बडी किताबे लेके बैठा है।'' हा काही ऐकेना. ""अरे, इतना सामान कैसे लेके जायेंगे तेरे माता पिता?'' पण तो कोणाचेच काही ऐकेना. डब्यातल्या सगळ्यांनी समजावले; पण हा काही ऐकेना. शेवटी एका तरुणाने त्याची समजूत घातली. गप्प बसला. परत मध्यरात्र झाल्यावर सुरू. वडिलांनाही त्रास होऊ लागला होता. शेवटी आई-वडिलांनी सांगितले, ""उसकी मर्जी, उसको कुछ भी करने दो।'' भुसावळ स्टेशन आल्यावर लोकांनी त्याला उतरवले.