नको अधांतरी मौजा..

स्वाती देशपांडे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

वायुदल दिन उद्या (रविवारी) साजरा केला जाईल. पण आपल्याला या वायुसेनेविषयी कितपत माहिती असते? देश रक्षणासाठी खडे असलेल्या कोणत्याही सेनेविषयीची माहिती म्हणजे आपल्या "अधांतरी मौजा' असतात.

वायुदल दिन उद्या (रविवारी) साजरा केला जाईल. पण आपल्याला या वायुसेनेविषयी कितपत माहिती असते? देश रक्षणासाठी खडे असलेल्या कोणत्याही सेनेविषयीची माहिती म्हणजे आपल्या "अधांतरी मौजा' असतात.

"मॅडम, तुमचे सर निवृत्त हवाई दल अधिकारी आहेत ना!' 'हो, ' मी उत्तरले. (मनात "तुमचे सर' या शब्दयोजनेची गंमतही वाटली.)
'मॅडम, खरं सांगू का... मलासुद्धा मिलिटरीत जायची इच्छा आहे.'
'अरे वा! विचार स्तुत्य आहे.' मी माझ्या दक्षिण भारतीय विद्यार्थ्याचे कौतुक केले. 'म्हणजे तू नक्कीच बरीच माहिती जमवली असणार...' मी होरा बांधला. 'हल्ली काय, गुगलचं बटण दाबलं, की माहितीचा ठेवा समोर हजर... काय खरं ना?'
'नाही मॅडम, खरं तर फार काही माहीत नाही मला या क्षेत्राबद्दल.' विद्यार्थ्याने प्रांजळ कबुली दिली.

'बरं... खूप नाही... पण थोडीफार तरी माहिती असेलच ना. म्हणजे तिन्ही सेनादलांच्या सध्याच्या प्रमुखांची नावे, प्रत्येक सेनेतली विशिष्ट पदे वगैरे...' मी विचारून पाहिले. परंतु त्याचा चेहरा मात्र कोराच होता. 'बरं, आता असं कर... आजचा गृहपाठ समज आणि आत्ता विचारलेली सगळी माहिती शोधून आण... ठीक आहे!' त्याचा हिरमोड होऊ नये म्हणून मी सूचना केली. गणिताच्या तासानंतर हा वेगळाच गृहपाठ मिळाल्याच्या आनंदात त्याने माझा निरोप घेतला. परंतु मला मात्र त्याचं बोलणं पुन्हा पुन्हा आठवत राहिलं. सैन्यदलात "करिअर' करू इच्छिणाऱ्या युवकाच्या या अवस्थेला कोण जबाबदार आहे? आणि ज्यांना या वाटेनं जायचंही नाही त्यांना या क्षेत्राबद्दल कितपत आत्मीयता वाटत असेल! युवा पिढीला सैन्यदलांबद्दल माहिती सोडा, पण रास्त अभिमान तरी आहे का? काही परिचितांशी या संबंधी चर्चा केल्यावर "खरं तर असायला पाहिजे, पण आपल्याकडे तसं "कल्चर' नाही ना...' अशी सारवासारव समोर आली. देशवासीयांच्या रक्षणाकरिता रात्रंदिवस झटणाऱ्या आपल्या सैनिकांबद्दल आस्थेचं कल्चर समाजमनात एव्हाना रुजायला हवं होतं.

नुकतेच भारतीय वायुदलाचे सर्वोच्च अधिकारी मार्शल ऑफ द इंडियन एअर फोर्स अर्जन सिंग यांचे निधन झाले. त्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहावं तेवढं थोडंच आहे. सर्वाधिक म्हणजे "फाइव्ह स्टार रॅंक्‍स'नी गौरवले गेलेले भारतीय वायुसेनेचे ते एकमेव अधिकारी होते. परंतु त्यांच्या श्रद्धांजलीसंबंधी मुलाखतीत काही उच्चपदस्थ व्यक्तींनी अर्जन सिंग यांच्या रॅंकबद्दलही घोळ घातल्याचे कानावर आले, तेव्हा मन खरंच व्यथित झाले. गुगल काळात इतकी प्राथमिक माहितीही जाणून न घेता मुलाखती देण्याच्या अनास्थेला काय म्हणावे?

एका मैत्रिणीकडून ऐकायला मिळालेला अनुभवही असाच खिन्न करून सोडणारा होता. ती नुकतीच द्रासला गेली होती. एका हवाईदल अधिकाऱ्याची पत्नी ती... "कारगिल वॉर मेमोरियल'च्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवताच युद्धकाळाच्या, हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या विचाराने अस्वस्थ झाली. परंतु त्याहूनही अधिक व्यथित झाली ते तिथे हसत-खिदळत "सेल्फी' काढण्यात गर्क असलेल्या पर्यटकांना पाहून. अशा पवित्र स्थळाचे पावित्र्य कसे जपायचे हे शिकवावं का लागावं बरं! या पार्श्‍वभूमीवर "व्हॉट्‌सऍप'वरून आलेल्या एका संदेशाचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. भारतीय लष्करातले एक निवृत्त अधिकारी अमेरिकेतल्या एका विमानतळावर "चेक इन'च्या रांगेत उभे होते. एका विमानतळ कर्मचाऱ्याशी झालेल्या संवादातून ते गृहस्थ लष्करी अधिकारी असल्याचे समजताच त्या कर्मचाऱ्याने त्यांना खास फौजींकरिता असलेल्या रांगेत जाण्यास सुचवले. आपण अमेरिकी नव्हे, तर भारतीय लष्करात कामाला होतो, असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिल्यावर तो कर्मचारी म्हणाला, 'अमेरिकी असो वा भारतीय, तुम्ही लष्करातून निवृत्त झालात हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अन्‌ आमच्याकरिता तुमचे स्थान खास आहे ते त्यामुळेच.' मला इथे तुलना देशांची नव्हे, तर वृत्तीची करावीशी वाटते. मग आपली मानसिकता कशी बदलता येईल?

माझ्या मते ते फारसं अवघड नाही. साधं बघाना, आपण आपल्या जवळच्या मंडळींच्या संपर्कात असतो. जाणं-येणं ठेवतो. घरी त्यांचा विषय निघतो. साहजिकच घरातल्या मुलांना "आपली' माणसं कोण हे चटकन कळतं. घरात आलेल्या नव्या सुनेला देखील आपल्या सासरघरची जवळीक कुणाकुणाशी आहे हे काही दिवसांतच उमजतं. यासारखंच जर आपल्या मुलांना, नात्यातल्या किंवा ओळखीतल्या युवापिढीला लहान वयापासून सहजपणे सैन्यदलांबद्दल माहिती उपलब्ध करून दिली, त्यांची उत्सुकता, कुतूहल जागृत केले, तर मुलांच्या जडणघडणीच्या काळात देशप्रेम आणि सैनिकांबद्दलचा अभिमान त्यांच्या मनात सहजपणे रुजेल. आपल्या परिचयात, नात्यात सैन्यदलातील कुणी व्यक्ती असतील, तर मुलांची त्यांच्याशी भेट घडवून आणली, तर नुसते त्यांचे अनुभव ऐकूनही मुलं बरंच काही शिकू शकतील.
समाजाकडून "फोजी भाईयोंके लिए' करायला बरंच काही आहे.