पाठीशी जरंडा भक्कम

विदुला साठे
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

श्रावणातल्या दर शनिवारी जरंडेश्‍वराला जायचे. लहानपणी इतकी भक्ती अन्य कोणत्या देवांची केली नाही. त्याच्यापाशी काय मागत होते त्या वेळी, हे आता आठवत नाही. तो मात्र पाठीशी भक्कम उभा आहे.

श्रावणातल्या दर शनिवारी जरंडेश्‍वराला जायचे. लहानपणी इतकी भक्ती अन्य कोणत्या देवांची केली नाही. त्याच्यापाशी काय मागत होते त्या वेळी, हे आता आठवत नाही. तो मात्र पाठीशी भक्कम उभा आहे.

सातारारोड या गावाच्या एका बाजूला पावसाच्या ओल्या मातीचा डोंगर करून वर पुन्हा हातांनी दाबून मातीची मूद ठेवावी, असा नांदगिरी आणि दुसरीकडे रांगडा असा जरंडा. श्रावणातल्या चारही शनिवारी जरंड्यावर जायला मिळायचे. शनिवारी सकाळची शाळा सुटली, की जरंड्याला निघायचे. बरीच मुले शाळेच्या गणवेशातच भेटायची. जरंडेश्‍वर तसा गावापासून थोडा लांब. कॉलनीच्या चार भिंतीतून बाहेर पडल्यावर एक वेगळेच जग अनुभवत असू. प्रथम लागायचे ते महादेवाचे मंदिर. छोटेसेच, पण अगदी चित्रात काढावे असे-नदीच्या काठावर. तिथेच एक मोठे चिंचेचेही झाड होते. महादेवाला नमस्कार करून खाली उतरले, की वसना नदीत पाय भिजवायचे. नदीला फार पाणी नसायचे, पण दगडगोटे, शेवाळे यावरून हमखास पाय निसटायचे. एकमेकांचे हात धरूनच नदीपात्र पार करावे लागत असे. मग थोडे वर आले, की पाडळी हे गाव लागायचे. तिथल्या घरातल्या बायाबापड्या कौतुकाने आमच्याकडे पाहत असायच्या. आता पुढे जाईल तसे गाव मागे पडायचे आणि दुतर्फा शेती असणारी पायवाट लागायची. चिखलावर गुंरांच्या खुरांचे, चपलाबुटांचे ठसे उमटलेले असायचे. आता बाजूला हिरवे शेत, वर निळे आकाश, कधी ढग तरंगायचे आणि समोर रुंद आडवा जरंडा. डोंगरावर माणसांची ठिपक्‍यांची रांग दिसायची. डोंगराकडे बघत बघत पुढे चालले, की जरंडासुद्धा मोठ्या मोठ्या ढांगा टाकत आपल्याकडे येत आहे असा मला भास व्हायचा. एकीकडे घट्ट वेण्यांमधून झिरपत घाम मानेवर येत असायचा, तेव्हाच एखादा मोठ्ठा ढग सूर्याआड येऊन आमच्यावर सावली धरायचा. मग त्या ढगांबरोबर पळायचो आम्ही. असे करत पायथा कधी यायचा कळायचेच नाही. बरोबरचे सवंगडी थोडे-मागे पुढे व्हायचे. पण इथे मोठ्या खडकापाशी सर्वांनी एकत्र जमायचे संकेत असायचे.

जरंड्याला नमस्कार करून चढाई सुरू. सकाळी लवकर उठून गेलेली मंडळी आता उतरत असायची. पॉंऽऽऽ असा आवाज करणारे फुगे वाजवत किंवा पाण्याचा रबरी चेंडू खेळत मुले उतरत असायची. अगदी छोटी कडेवर बसून हातातला फुगा सुटू न देण्यासाठी धडपडत असायची. डोंगर चढताना मला नेहमी सगळ्यांच्या पुढे जायचे असायचे. मी वर दिसणाऱ्या एखाद्याला भोज्या ठरवायचे - आता त्या लालसाडीवाल्या बाईला गाठायचे. मग जरा वेग वाढवायचा. तिच्यापुढे जाताना उगाचच तिच्याकडे बघून हसायचे, विजयी मुद्रेने. हा आनंद थोडावेळ टिकायचा. कारण परत निळी रिबीनवाल्या मुलीला भोज्या ठरवलेले असायचे. सुरवातीच्या उत्साहाने लगेचच "मारुतीचा अंगठा' लागायचा. याची एक दंतकथा आहे. मारुती जेव्हा द्रोणागिरी पर्वत उचलून नेत होता, तेव्हा पर्वताचा पडलेला काही भाग म्हणजेच जरंडा. आणि इथे मारुतीने अंगठा टेकवला होता. एका पसरट दगडावर एक खोलगट अंगठ्याचा ठसा. आम्ही तिथे श्रद्धेने फुले वाहून नमस्कार करीत असू.

निम्म्याच्या वर डोंगर चढल्यावर एक मोठे तळे आहे आणि तसाच मोठा वटवृक्ष. त्याच्या सावलीत बसायचे. थंडगार पाणी प्यायचे. तिथून खाली नजर टाकली, की कौलारू घरांचे लाल लाल ठिपके दिसायचे. मध्येच देवळांची शिखरे, तर दुसऱ्या बाजूला काडेपेटीसारखी कॉलनीतली घरे. नवरंगची मोठी इमारत वेगळी उठून दिसायची. बाकी सगळीकडे हिरवे गालीचे. कधी कधी ढग इतके खाली यायचे, की वरचा डोंगर दिसायचा नाही. तशीच ढगांतून वाट काढत वर पोचायचे. शेवटचे वळण घ्यायचे. पटकन कळतच नाही आपण वर पोचलो ते! एकदम माथ्यावरच येतो!
वर जुनेच तरी मारुतीचे मोठे देऊळ आहे. आधी देवळात जाऊन मारुतीचे दर्शन घ्यायचे. त्या वयात भक्तीपेक्षा जत्रेचे आकर्षण जास्त. भरपूर दुकाने. फेरीवाले, खाऊ आणि खेळणी. ठिकठिकाणी फुगेवाले. अगदी पाच रुपयांत भरपूर खरेदी व्हायची. देवळाच्या मागे गेले, की रामाचेही मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन मग निवांत जागा शोधायची. एव्हाना पोटात कावळे ओरडत असायचे. मग सगळ्यांची अंगत-पंगत! बहुधा पोळी, बटाट्याची भाजी, झुणका, थालीपीठ, कोणाचा दहीभात. सगळे तुटून पडायचे. मग कपाळावर एक पिवळ्या रंगाचा पट्टा ओढून त्यावर रंगीत फुलांचे ठसे उमटवायचे आणि चमकीही लावायची. आम्ही मात्र हा मळवट भरला नाही कधी. आजच्या भाषेत "जरंडा टॅटू.'

घरी येईपर्यंत फुगा फुटून जायचा. मग पिपाणी वाजवायची. संध्याकाळी परत गावातल्या मारुतीला जायचे.
इतकी भक्ती लहानपणी अन्य कोणत्याही देवाची केली नाही. तेव्हा हात जोडून काय मागत होतो, आता आठवत नाही. पण जरंडेश्‍वराने, तिथल्या मातीने, पाण्याने आम्हाला वेगळेच घडवले आहे. न कळत खूप मजबूत केले आहे. कोणत्याही प्रसंगी ना कधी डगमगले, ना संकटांची कधी भीती वाटली. नुसते जरंडेश्‍वराला आठवले तरी वाटते हा भरभक्कम जरंडा माझ्या पाठीशी अजून उभा आहे.