व्हीलचेअरवर चाळीस वर्षे

व्हीलचेअरवर चाळीस वर्षे

व्हीलचेअरवरचा प्रवास हा एक कठीण प्रयास असतो. आपल्याला यापुढे कधी चालताच येणार नाही, हे कळते तेव्हा तो धक्का मोठा असतो; पण न खचता आयुष्यात लढण्याची जिद्द ठेवली, तर जीवनाचा आनंद लुटता येतो.

लिबियाच्या ऊर्जा मंत्रालयाला सल्लागार म्हणून मी ट्रिपोलीला डिसेंबर 1976 मध्ये गेलो. तेथील ऊर्जामंत्री जुमा अलअरबाश म्हणाले, ""डॉ. गर्दे, आधी तुम्ही हा देश पाहा व मग काय काय अडचणी आहेत, ते जाणून नियोजनाला सुरवात करा.'' एका दौऱ्यावर असताना गाडी उलटली. माझ्या पाठीच्या दोन मणक्‍यांचे तुकडे होऊन माझ्या कंबरेखालील भाग संवेदनाहीन झाला. 180 किलोमीटरवरच्या टोब्रुक येथील रुग्णालयात गेलो; पण उपचारांसाठी न्युरो सर्जनची गरज होती. मंत्र्यांनी हवाई दलाचे विमान मागवले आणि मला बेंगाझीमधील मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले.

मणके मोडल्याने मज्जारज्जूला इजा पोचून कंबरेखालचा भाग लुळा झाला होता. दोन दिवसांनी एक लिबियन डॉक्‍टर व माझा मित्र अशोक अगरवाल यांच्याबरोबर मला लंडनजवळच्या एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोचवण्यात आले. पहिले साडेतीन महिने पाठीचे फ्रॅक्‍चर भरून येण्यासाठी एका विशेष पलंगावर पडून राहायचे होते, त्यानंतर कणा बरा झाल्यावर पुनर्वसन असा कार्यक्रम ठरला; मात्र यानंतर मला चालता येणार नाही, हे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर मला, माझ्या पत्नीला धक्काच बसला! या प्रकारच्या दुखापतीवर आजही काही उपाय निघालेला नाही. पुढचे आयुष्य व्हीलचेअरवर काढायचे होते; पण परिस्थिती स्वीकारून त्यावर मात कशी करायची, याचा विचार सुरू झाला. कशाही परिस्थितीत पुन्हा नोकरीवर जायचे व आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या हे ठरविले. सुदैवाने माझे मनोबल खचले नव्हते.

माझी पत्नी अतिशय धैर्यवान होती. ती 1962 च्या आयएएस बॅचमधील एकटी मुलगी होती. तिने आत्मबल बांधले. पुनर्वसनाच्या कार्यक्रमांतून रोजचे दैनंदिन जीवन कसे करायचे, व्हीलचेअरमधून पडल्यास पुन्हा स्वतः खुर्चीत कसे यायचे हे सर्व शिकलो. पाय अधू झाल्यामुळे हाताने चालवण्याची मोटार चालवायला शिकलो व सत्तर वर्षांपर्यंतचे ब्रिटिश लायसन्स मिळवले. इंग्लंडमध्ये व्हीलचेअरने जायला काहीही अडचण नव्हती. कारण, दोन महायुद्ध पाहिलेल्या युरोपीय देशांत व्हीलचेअरमध्ये असणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. त्यामुळे तशा सोयीही सर्वत्र आहेत. पुनर्वसनानंतर आम्ही 1979 मध्ये दिल्लीला परत आलो. मी पुन्हा कामावर रुजू झालो. माझ्या कंपनीने मला सोळाव्या मजल्यावर खोली दिली. कारण, तेथे डिझेल जनरेटरची लिफ्ट होती. लिबियन सरकारने हाताने चालवायची गाडी पाठवली. या हाताने चालवता येणाऱ्या गाडीमुळे मी पुन्हा स्वावलंबी झालो व रोज कामावर जाण्या-येण्यासाठी तसेच इतर ठिकाणी जाणेही शक्‍य झाले.

व्हीलचेअरमध्ये पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना माझ्या कार्यक्षमतेबाबत शंका असायची. त्यातून मला पुन्हा प्रस्थापित करायला वेळ लागला नाही. मला केवळ चालता येत नाही; पण माझ्या बौद्धिक क्षमतेत काही फरक पडलेला नाही, हे त्यांना पटवून दिल्यावर काम सोपे होई. 1981 मध्ये आम्ही भोपाळला रुजू झालो. तेथे व्यावसायिक व सांस्कृतिक, सामाजिक कार्यात भाग घेऊ लागलो.

भोपाळला भारत हेवी इलेक्‍ट्रिकल्सच्या कारखान्यात माझ्याकडे प्रथम संगणक विभाग देण्यात आला. व्यावसायिक क्षेत्रात इस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) च्या मध्य प्रदेश शाखेचा 1988-90 मध्ये अध्यक्ष झालो. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाच्या भोपाळ शाखेचा दोनदा अध्यक्ष झालो. 1993 मध्ये मध्य प्रदेश सरकारने अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय "पंडित लज्जाशंकर झा' पुरस्कार दिला. तीन आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी अमेरिका, इंग्लंड असे पुन्हा परदेश दौरेही व्हीलचेअरमधूनच झाले. 1995 मध्ये मी सरव्यवस्थापकपदावरून "भेल'मधून निवृत्त झालो. या सर्व प्रवासात समाजाने व्हीलचेअरला सामावून घेतले, हा त्यांचा मोठेपणा. व्हीलचेअरमधून भारतात आल्यावर विविध अनुभव आले. आधी मी देवळांत जात असे; पण आपल्या देवळांत पायऱ्यांच्या जोडीला व्हीलचेअरसाठी उतारपट्टी नाही हे जाणवले. शिर्डीला मात्र व्हीलचेअरसाठी उत्तम व्यवस्था आहे. साध्या फुटपाथवरून उतरून रस्ता ओलांडणे हे एक दिव्य ठरते. आता स्टेशन, विमानतळ येथे सोयी होत आहेत. पिटसबर्ग येथे एक भव्य श्री बालाजी मंदिर आहे. तेथे व्हीलचेअरने जाण्याची उत्तम सोय आहे. भोपाळमध्ये ब्रिटिश लायब्ररीत मी त्यांचा फार जुना वाचक म्हणून इमारतीला बाजूने एक उतारपट्टी करून सोय करून दिली.

माउंट एव्हरेस्टवर चढणारे पहिले भारतीय म्हणजे मेजर हरिकुंवरसिंग अहलुवालिया. त्यांना नंतर काश्‍मीरमधील चकमकीत पाठीच्या कण्याला इजा होऊन ते व्हीलचेअरमध्ये आले. त्यांनी "हायर दॅन एव्हरेस्ट' या त्यांच्या आत्मचरित्रात शेवटचे वाक्‍य लिहिले आहे- "मी जगातले सर्वांत उंच शिखर चढलो; पण पॅराप्लेजियामुळे व्हीलचेअरमधून जीवन जगणे हा त्यापेक्षाही उंच प्रयास आहे.'
माझ्या या प्रयासात अनेकांचा सहकार्याचा हात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com