गुरुवंदन

विठ्ठल मणियार
शनिवार, 8 जुलै 2017

आपल्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांना आदर, प्रेम असतेच. विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या एका क्रीडाशिक्षकाचा सत्कार करून त्यांच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केली.

आपल्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांना आदर, प्रेम असतेच. विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या एका क्रीडाशिक्षकाचा सत्कार करून त्यांच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केली.

"अरे! हा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत नसून, शरद पवार या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते आपल्याच गुरूंचा होत आहे, त्यामुळे तो मी करण्याऐवजी साहेबांनीच करणे अधिक योग्य आहे,'' अशा शब्दांत तत्कालीन उद्योगमंत्री विनायकराव पाटील यांनी आमची समजूत काढली आणि कार्यक्रमास आलेले सर्व विद्यार्थी साहेबांची वाट बघत गप्पा मारत बसलो. हा प्रसंग आहे बी.एम.सी.सी.मधील आमचं महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर पंधरा-सोळा वर्षांनी घडलेला.

सत्कार होता आमचे क्रीडाशिक्षक रघुनाथ खाणीवाले सरांचा. ते विद्यार्थ्यांवर अतिशय प्रेम करणारे आणि आम्ही व्यायाम करावा याबाबत कटाक्ष असणारे होते. इतर खेळात भाग घेत असूनही सरांचा पी.टी.चा तास सहसा चुकवला जात नसे. मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुटीत सर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना सहसा घरी जाऊ देत नसत. आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन सोमवार पेठेतील शाहू तलावावर पोहावयास जात असू. परतताना रास्ता पेठेतील उडप्याच्या हॉटेलमध्ये नाश्‍ताही द्यायचे. सरांनी मिनी ऑलिंपिकमध्ये धनुर्विद्येत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. पुढे त्यांनी ज्यूदोमध्ये ब्लॅकबेल्टही मिळवला. 1961 ला पानशेत धरण फुटले, त्या वेळेस आम्ही कॉलेजचे मैदान सोडून संभाजी पुलावरून खाणीवाले सरांच्या नारायण पेठेतील घराजवळ जाण्याचा प्रयत्न केला. सरांचे घर वाहून गेले होते. डोळ्यादेखत सरांचा संसार उद्‌ध्वस्त झाला होता. अशाही परिस्थितीत सर आमच्याशी बोलले, ""अरे पोरांनो, संसार आणि घर काय मी पुन्हा उभे करेन, पण ते सुवर्णपदक, ब्लॅकबेल्ट यासारखा अमूल्य ठेवा मी कसा परत आणू?'' सरांची ती असहायता हृदयाला कायमची छेदून गेली.

सर निवृत्त झाले. विद्यार्थ्यांना ज्यूदोचे शिक्षण देत राहिले. पत्नी आणि सर एवढेच कुटुंब. तुटपुंज्या पेन्शनवर घर चालत होते, आर्थिक परिस्थिती बेताचीच. दरम्यान, लष्करात असलेला कर्नल संभाजी पाटील सुटीत पुण्यात आला होता. त्याची सरांची भेट झाली. त्याने त्याच दिवशी मला येऊन सरांची परिस्थिती सांगितली. पवारसाहेब त्या वेळेस कृषिमंत्री होते, त्यांचा दौरा पुण्यात होता. मी आणि कर्नलनी साहेबांना भेटून सरांच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेबांबरोबर खाणीवाले सरांच्या लोकमान्यनगर येथील घरी गेलो. बरोबर सुशीलकुमार शिंदेही होते. अचानक आलेले पाहून सरांच्या पत्नी आनंदल्या. आम्ही त्यांना काकू म्हणत असू. काकूंनी नेहमीप्रमाणे सतरंजी अंथरली. डब्यातून चुरमुरे, लाडू असे नेहमीचे पदार्थ आणून आमच्या पुढ्यात वर्तमानपत्रावर ठेवले. काकू आम्हाला कधीही खायचे पदार्थ ताटलीत देत नसत. आजही सरांचे विद्यार्थीच आहोत, याच भावनेने काकू वावरत होत्या. आपल्याकडे आलेले हे कोणी मंत्री आहेत, याची किंचितही जाणीव त्या माउलींच्या वागण्या-बोलण्यात नव्हती. आम्ही विद्यार्थी असताना वागायच्या तशाच त्या वागत होत्या. त्यामुळे खाणीवाले सरांना अवघडल्यासारखे होत होते. संध्याकाळी पुन्हा पवारसाहेबांना भेटल्यावर सरांना काही निधी देऊ, त्याच्या व्याजावर पेन्शनसारखे दरमहा त्यांना पैसे मिळतील, अशी कल्पना साहेबांनी मांडली. त्याप्रमाणे निधी गोळा करण्याचे ठरले. मी व्यापारी आणि पुण्यातच स्थायिक असल्यामुळे निधी गोळा करण्याची जबाबदारी माझ्यावरच आली. त्याकाळी 51 हजार रुपये जमविण्यासाठीही तब्बल दोन वर्षे लागली.

हा निधी खाणीवाले सरांना देण्यासाठी कॉलेजमध्येच कौटुंबिक समारंभ करायचे ठरले. पवारसाहेबांच्या हस्ते सत्कार ठरला. अध्यक्ष म्हणून उद्योगमंत्री विनायकराव पाटील यांना निमंत्रित केले होते. आता साहेब मुख्यमंत्री झाले होते. महाराष्ट्रात त्या वेळी गंभीर वीजतुटवडा होता. त्याबाबतच्या एका महत्त्वाच्या बैठकीत साहेब मुंबईत अडकले होते. इकडे कार्यक्रमासाठी सर्व ठिकाणाहून विद्यार्थिमित्र जमलो होतो. गप्पा-टप्पा रंगल्या होत्या. महत्त्वाच्या बैठकीमुळे कार्यक्रमास साहेब येतील की नाही, याबाबत माझ्या मनात धाकधूक चालू होती. सतत मुंबईला संपर्क चालू होता. अखेर रात्री आठ वाजता साहेब विमानतळाकडे निघाल्याचा संदेश मिळाला. काही वेळाने दादरच्या पुढे ते कुठे आहेत हे कंट्रोल रूमला समजेना. माझी धाकधूक परत वाढली. मी न राहून "आपण तुमच्याच हस्ते सत्कार करू', अशी विनंती विनायकरावांना केली. पण विद्यार्थ्याच्या हस्ते होणारा सत्कार महत्त्वाचा, अशी विनायकरावांनी माझी समजूत काढली. साहेब मुंबई विमानतळावर पोचले असल्याचा संदेश आला. नऊ वाजण्याच्या सुमारास साहेब विमानतळावर उतरले. तडक कॉलेजमध्ये आले. रात्रीचे दहा वाजले होते. पुढे हा सरांच्या सत्काराचा कार्यक्रम साडेअकरापर्यंत रंगला. आम्हा विद्यार्थ्यांचा मेळावा, साहेबांनी केलेले हृद्य भाषण आणि महाविद्यालयीन जीवनातील आठवणी. अत्यंत आनंदामुळे सत्काराला उत्तर देताना खाणीवाले सरांच्या तोंडातून शब्द निघण्याऐवजी फक्त डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळत होते.