मध्य रेल्वे मार्गावर 10 नवीन लोकल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

- 12 डब्यांच्या लोकलमधील प्रवासी ः 2,400 
- 15 डब्यांच्या लोकलमधील प्रवासी ः 3000 
- सीएसएमटी-कल्याण मार्ग ः सध्या 15 डब्यांच्या 16 फेऱ्या 
- पश्‍चिम रेल्वे मार्ग ः सध्या 15 डब्यांच्या 54 फेऱ्या 

मुंबई - मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील वाढती प्रवासी लोकसंख्या पाहता जलद मार्गावर 12 डब्यांऐवजी 15 डब्यांच्या लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने 10 नवीन लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या लोकल सीएसएमटी ते आसनगाव, सीएसएमटी ते बदलापूर मार्गावर चालवल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली. 

मध्य रेल्वे मार्गावर ऑक्‍टोबर 2012 मध्ये 15 डब्यांच्या लोकल सुरू झाल्या होत्या. सध्या या लोकल सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावर आहेत. मात्र, कल्याणच्या पुढे वेग आणि फलाटांची कमी लांबी यामुळे मर्यादा आल्या होत्या. दिवसेंदिवस बदलापूर ते आसनगावपर्यंत प्रवासी संख्या वाढत गेली. याचा विचार करता मध्य रेल्वेने 15 डब्यांच्या नवीन लोकल सीएसएमटी ते बदलापूर या पहिल्या टप्प्यात आणि सीएसएमटी ते आसनगाव मार्गावर दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्याचे नियोजन केले आहे. 

15 डब्यांच्या नवीन लोकल चालवण्यासाठी या मार्गावरील स्थानकांमधील फलाटांचा विस्तार, कारशेडमध्ये लोकल उभ्या करण्यासाठी शेड, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आणि इतर तांत्रिक कामे हाती घ्यावी लागणार आहेत. त्यासाठी सुमारे 1,200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास बदलापूर ते आसनगावपर्यंतचा प्रवास जलद होईल. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या व इतर लोकलमधील प्रवाशांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. मध्य रेल्वेने हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवला आहे. हा प्रकल्प एमयूटीपी 3 ए अंतर्गत "एमआरव्हीसी' हाती घेईल. रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यास लवकरच हा प्रकल्प सुरू केला जाईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. 

- 12 डब्यांच्या लोकलमधील प्रवासी ः 2,400 
- 15 डब्यांच्या लोकलमधील प्रवासी ः 3000 
- सीएसएमटी-कल्याण मार्ग ः सध्या 15 डब्यांच्या 16 फेऱ्या 
- पश्‍चिम रेल्वे मार्ग ः सध्या 15 डब्यांच्या 54 फेऱ्या 

Web Title: 10 new local trains on Central Railway route