तोतया आमदाराकडून आठ कोटींची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट देण्याचे प्रलोभन दाखवत आठ कोटींची फसवणूक करणाऱ्या तोतया आमदाराला आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) मंगळवारी अटक केली. आरोपीने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यालयीन पत्र, बनावट स्वाक्षरी व शिक्‍क्‍याचा वापर करून फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. 

मनोजसिंग रघुपती ठाकूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मिरा रोड येथे राहतो. ठाकूर हा समाजवादी पक्षाचा उत्तर प्रदेशातील विधान परिषदेवरील आमदार असून, विविध समित्यांवर काम करतो, अशी बतावणी करत असे. भारतीय रेल्वे बोर्डाचा सदस्य असल्याचेही त्याने भासवले होते. तक्रारदार गौतम बोहरा हे कांदिवली पूर्व येथे राहतात. त्याच्यासह आरोपीने एकूण पाच जणांना मुख्यमंत्री कोट्यातील घर मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक केली, असे तपासात उघड झाले आहे. बोहरा यांच्याकडून ठाकूरने दोन कोटी 44 लाख, त्यांचा भाचा राजेश कटारिया याच्याकडून 67 लाख, शैलेंद्र श्रीमल यांच्याकडून तीन कोटी 73 लाख, राकेश गोलेचा यांच्याकडून 96 लाख व संदीप अग्रवाल यांच्याकडून 36 लाख असे एकूण आठ कोटी 17 लाख 96 हजार रुपये घेऊन त्याने फसवणूक केली आहे. तीन वर्षांपूर्वी आरोपीने फ्लॅट देण्याचे प्रलोभन दाखवून ही फसवणूक केली. फ्लॅट न मिळाल्याने संबंधितांनी ठाकूरकडे पैशांची मागणी करण्यास सुरवात केली. नंतर ठाकूरशी संपर्क होत नसल्यामुळे बोहरा यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. 

Web Title: 8 crore fraud by the deceased MLA