आदित्य ठाकरे राष्ट्रीय राजकारणात ? 

महेश पांचाळ 
सोमवार, 15 मे 2017

शिवसेना प्रमुखांसह या घराण्यातील कोणतेही ठाकरे आतापर्यंत निवडणूक लढले नाहीत. तिसऱ्या पिढीतील आदित्य यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणांत उतरुन बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेनेचे दिल्ली दरबारातील वजन टिकविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत बसून दिल्लीच्या राजकारणात नेहमीच खळबळ उडवून दिली. त्या शिवसेनाप्रमुखांचे नातू आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंना दिल्लीच्या राजकारणात सक्रिय करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेचा महाराष्ट्रबाहेर पक्ष म्हणून विस्तार व्हावा आणि दिल्लीच्या राजकारणात थेट सहभाग असावा यासाठी ही रणनीती आखण्यात येत आहे. राज्यसभेची खासदारकी देवून किंवा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना थेट रणांगणात उतरविण्याचाही विचार पक्षात सुरू असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. 

शिवसेना प्रमुखांसह या घराण्यातील कोणतेही ठाकरे आतापर्यंत निवडणूक लढले नाहीत. तिसऱ्या पिढीतील आदित्य यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणांत उतरुन बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेनेचे दिल्ली दरबारातील वजन टिकविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीत पहिल्यांदा युवा सेनेच्या माध्यमातून यश प्राप्त केल्यानंतर,आदित्य यांच्या नेतृत्वाची चर्चा होऊ लागली. शिवसेनेसमोर भाजपाने मोठे आव्हान उभे केले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आदित्य यांचा सक्रिय सहभाग होता. 

दुसरीकडे केंद्रात मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणावर जाहीरपणे टीका करण्याचे धाडस उद्धव ठाकरे यांनी अनेकदा दाखवून दिल्याने देशातील विरोधी पक्ष तसेच प्रादेशिक पक्षांमध्ये शिवसेनेच्या भूमिकाबाबत उत्सुकता आहे. शिवसेना केंद्रात भाजपासोबत असली तरी, नोटाबंदी, काश्‍मिरचा प्रश्‍न आदीबाबत शिवसेनेने स्वतंत्र भूमिका मांडलेली आहे. 

सध्या शिवसेनेचे 18 खासदार तसेच राज्यसभेचे तीन खासदार आहेत. देशाच्या राजकारणाची सूत्रे दिल्लीतूनच अखेर हलतात. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणाचे बारकावे आणि राष्ट्रीय राजकारणाचा बाज समजावून घ्यायचा असेल तर दिल्लीमध्ये वास्तव्य अपरिहार्य ठरते. दिल्लीमध्ये किमान वीस वर्षाची इनिंग आवश्‍यक मानली जाते. त्यामुळे आता आदित्य यांना दिल्लीच्या राजकारणात सक्रीय करण्याच्या हालचाली सुरू आहेत.