मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही निवासी डॉक्‍टर संपावरच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

मुंबई - निवासी डॉक्‍टरांनी कामावर रुजू व्हावे, यासाठी त्यांच्यासमोर हात जोडण्याचीही माझी तयारी आहे. तरीही ते ऐकत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करू, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिला. त्यानंतरही निवासी डॉक्‍टरांनी "सामूहिक रजा' आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केलेले नाही.

दरम्यान, न्यायालयात महापालिकेच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, या संपाच्या काळात मुंबईत 135 जणांचा मृत्यू झाला. राज्यभरात 377 जण दगावले.

निवासी डॉक्‍टरांनी पुकारलेल्या संपाच्या काळात रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग रुग्णांसाठी सुरू ठेवण्यात आले होते; तरीही राज्यात एकूण 377 मृत्यूंची नोंद झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी मात्र "हे मृत्यू संपामुळे नव्हे, तर संपकाळात झाले आहेत,' असे म्हटले आहे. मृत्यूचा आकडा ऐकल्यानंतर न्यायालयानेही डॉक्‍टरांवर कारवाई करण्यास परवानगी दिली होती.
न्यायालयासमोर हजर झालेल्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्‍टर्स (मार्ड) या संघटनेनेही निवासी डॉक्‍टरांना संप मागे घेण्याची विनंती केल्याचे सांगितले. त्यानंतरही कामावर रुजू न होणाऱ्या डॉक्‍टरांवर कारवाई करण्यास "मार्ड'ची हरकत नसेल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सायंकाळी उशिरापर्यंत मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील 2 हजार 300 पैकी 900 डॉक्‍टर कामावर रुजू झाले.