विमानतळ परिसरातील टोल नाका पाडला बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

मुंबई - मुंबई विमानतळ परिसरात बेकायदा प्रवेश टोल आकारून प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोप करत मंगळवारी शिवसेनेने हा टोल नाका बंद पाडला. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे परिसरात बराच वेळ तणाव पसरला होता. हा टोल पुन्हा सुरू केल्यास विमानतळच बंद पाडू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

मुंबई विमानतळ परिसर अतिसंवेदनशील आहे. वाहनांची वर्दळ कमी व्हावी यासाठी खासगी वगळता इतर वाहनांसाठी एन्ट्री टोल घेतला जातो. विमानतळ प्राधिकरण आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि.मधील करारानुसार टोल ठरवण्याचे अधिकार जीव्हीके कंपनीकडे आहेत. प्रवाशांसाठी खास उन्नत मार्ग बांधण्यात आला आहे. त्यांच्या सेवेसाठी हजारो कर्मचारी असतात. हे प्रवेश शुल्क देखभालीसाठी खर्च होते, असा दावा विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या जीव्हीके कंपनीने केला आहे. प्रत्येक वाहनचालकाकडून 130 रुपये घेतले जातात; मात्र शिवसेनेने ही लूट असल्याचा दावा करत मंगळवारी आंदोलन केले. आमदार ऍड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेच्या आंदोलनाची कुणकुण लागल्याने सकाळपासूनच या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे टॅक्‍सीत बसून गटागटाने शिवसैनिक विमानतळ परिसरात आले आणि त्यांनी टोल नाका बंद पाडला. यामुळे काही वेळ तणाव पसरला होता. वाहतूक कोंडीही झाली होती. हा टोल नाका पुन्हा सुरू झाल्यास विमानतळ बंद पाडू, असा इशाराही ऍड. परब यांनी दिला.