"राष्ट्रवादी'च्या छकुल्या औकातमध्ये रहा : अनिल गोटे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

जो मै बोलता हूँ, वो करता हूँ ! और जो मै नाही बोलता, वो मै जरूर करता हूँ , नही तो ढुँढते रह जावोगे. तेव्हा राष्ट्रवादीच्या छकुल्या आपल्या औकातीत रहा

मुंबई : महानगरपालिका, जिल्हापरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळविले. या निवडणुकीदरम्यान भाजपने अनेक पक्षांमधील नेत्यांना आपल्यामध्ये सामावून घेतले. एरवी दुसऱ्या पक्षांमध्ये गुंड राजकारण करतात, असे दवंडी पिटणारे भाजपचे वरिष्ठ नेते यावेळी पक्षातील काही गुंड नेत्यांबद्दल मौन बाळगून होते; पण आता भाजपच्या एका आमदाराने बंड पुकारले आहे. धुळ्याचे "राष्ट्रवादी'चे शहर अध्यक्ष मनोज मोरे यांच्या भाजप प्रवेशावर सत्तारूढ पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता गुंडच राजकारण करणार का? असा सवाल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विचारला आहे. 

"आय एम वन मॅन आर्मी. डोन्ट अंडरएस्टीमेट मी ! जो मै बोलता हूँ, वो करता हूँ ! और जो मै नाही बोलता, वो मै जरूर करता हूँ , नही तो ढुँढते रह जावोगे. तेव्हा राष्ट्रवादीच्या छकुल्या आपल्या औकातीत रहा,' असा इशारा आमदार अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांना दिला आहे.  

मनोज मोरे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल गोटे फारच आक्रमक झाले आहेत. उसने नेते आमच्यावर लादू नका. मर्द हा मर्दासारखाच वागला पाहिजे, असे वाभाडे गोटे यांनी मनोज मोरे यांच्या पक्षप्रवेशाबद्‌द्‌ल काढले आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपची अंतर्गत दुफळी समोर येण्याची चिन्ह आहेत. यापूर्वी देखील भाजपने अनेक स्तरावर गुंड पार्श्वभूमी असणाऱ्या विविध पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांना सामावून घेतले होते. भाजपामध्ये वाल्याचा वाल्मिकी होतो म्हणून आम्ही गुन्हेगारांना पक्षात घेतले असे प्रतिपादन करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षात आयात केलेल्या नेत्यांचे समर्थन केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री याप्रकरणी काय तोडगा काढणार व पक्षाचे निष्ठावंत आमदार अनिल गोटे यांची मनधरणी काशी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.