नागालॅंडमधून लष्कराचा पेपर फुटला

- श्रीकांत सावंत
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

ठाणे  आर्मी रिक्रुटमेंट बोर्डाच्या लष्कराच्या विविध पदांच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सैन्य दलाच्या नागालॅंड येथील मुख्यालयातून फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूर येथील सैन्य दलाच्या कार्यालयातील लिपीकाच्या मदतीने आणि प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून थेट उमेदवारांपर्यंत पोहचवण्याची साखळीच या प्रकरणाच्या निमित्ताने उघड झाली आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने परीक्षा केंद्रापर्यंत जाणारी ही प्रश्नपत्रिका नागालॅंड येथील वरिष्ठ अधिकाऱ्याने फोडल्यामुळे या व्यवस्थेतील भ्रष्टपणा उघड झाला आहे. याप्रकरणी नागपूर सीबीआयकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

भारतीय सैन्य दलाच्या जनरल ड्युटी, टेक्‍निकल, क्‍लार्क आणि ट्रेड्‌समन या चार पदांच्या भरतीसाठी रविवारी (ता. 26) घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे पेपर फोडण्याची योजना तब्बल तीन महिन्यांआधीपासूनच आखली होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. नागालॅंड येथील सैन्यभरतीच्या कार्यालयामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले अधिकारी धाकलू पाटील यांचे नाव यामध्ये समोर आले आहे. त्यांच्याकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका येत असल्यामुळे त्यांनी थेट नागपूर येथील सैन्य कार्यालयातील लिपीक रवीकुमार याच्याशी संपर्क करून प्रश्नपत्रिका विकण्यासाठी मदत करण्यास सांगितले. त्यानंतर रवीकुमार याने थेट महाराष्ट्रातील सगळ्या सैन्य भरती प्रशिक्षण केंद्रातील संचालकांशी संपर्क करून त्यांना या प्रश्नपत्रिका विकण्यासाठी गळ घातली. या बदल्यामध्ये रवीकुमार याने संचालकांकडून स्वत:साठी 90 हजार आणि पाटील याच्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली होती. तर उर्वरित रक्कम संचालकांनी घ्यावी, असे त्यांचे ठरले होते.

ठाण्यातील एका संचालकाने मात्र थेट पोलिसांकडे तक्रार करून या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर पोलिसांनी सगळ्या केंद्रांवर धाडी मारून हा प्रकार उघड केला, अशी माहिती ठाणे पोलिसांकडून देण्यात आली. वरिष्ठ अधिकारी पाटील आणि लिपीक रवीकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

सीबीआयची कारवाई
सैन्य दलाच्या प्रश्नपत्रिका फुटीच्याप्रकरणी सीबीआयकडूनही कारवाई सुरू केली आहे. त्यांनी या प्रकरणी नागालॅंड येथील अधिकारी आणि नागपूर येथील लिपीक रवीकुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नागालॅंडवरून व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून रवीकुमारला पेपर मिळाल्यानंतर तो सगळ्या क्‍लासेस संचालकांना ही प्रश्नपत्रिका पुढे पाठवत होता. तीन महिन्यांपासून त्यासाठी त्यांनी पूर्ण नियोजन केले होते. या प्रकरणाचा तपास नागपूरमध्ये सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Web Title: army paper leakage in nagaland