रेल्वेच्या 'चावीवाल्यां'चे खांद्यावरील वजन हलके

- तुषार अहिरे
रविवार, 29 जानेवारी 2017

मुंबई - रुळांवरून वेगाने जाणाऱ्या लोकल व एक्‍स्प्रेस गाड्यांच्या चालकांची मदार रेल्वेच्या "चावीवाल्या'वर असते. रेल्वेच्या क्रमवारीत अगदी शेवटच्या क्रमांकावर असलेला चावीवाला किंवा "की मॅन'ला रेल्वेचा कणा म्हटले तरी हरकत नाही. रुळांना तडे गेले किंवा अगदी गाडीतून प्रवासी खाली पडला तरी रेल्वे प्रशासनाला बित्तंबातमी देणाऱ्या या चावीवाल्याच्या पाठीवरच्या सामानाचे वजन कमी झाले आहे. त्यांना नव्या बॅगाही देण्यात आल्या आहेत.

ब्रिटिशांच्या राजवटीपासून अस्तित्वात असलेला "रेल पथ' हा विभाग 24 तास काम करतो. रेल्वेच्या इतर विभागांप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा तर नाहीच; पण सुटीच्या दिवशीही त्यांना काम करावे लागते. या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे डोळे म्हणजे "ट्रॅक मॅन' व "की मॅन'. पूर्वी गॅंगमन म्हणून हे कर्मचारी ओळखले जात. कालांतराने श्रेणीतील बदलानंतर पदाचे नाव बदलले. त्यातील चावीवाला दररोज आखून दिलेल्या लोहमार्गावर आठ किलोमीटरचा टप्पा गाठतो. लोहमार्ग सुस्थितीत आहे की नाही, त्याची चाचपणी करण्याची जबाबदारी चावीवाल्यांवर असते. पूर्वी अवजड लोखंडी साहित्याने भरलेल्या बॅगा एका खांद्यावर ठेवून चावीवाला लोहमार्गावर फिरत असे. या साहित्याने दबलेल्या त्यांच्या खांद्यांची दखल उशिरा का होईना रेल्वे मंत्रालयाने घेतली. समिती नेमून हे वजन कमी करण्यासाठी पाहणी केली. त्यानुसार पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील चावीवाल्यांना तुलनेने हलक्‍या असणाऱ्या नवीन बॅगा मिळाल्या आहेत.

तिन्ही पाळ्यांत रात्रंदिवस काम करणाऱ्या चावीवाल्यांमुळे गाड्यांचा वेग राखला जातो. पश्‍चिम रेल्वेच्या हद्दीत 400 हून अधिक ट्रॅक मॅन आहेत. मुंबई विभागाच्या चार हद्दींत 50 ते 60 चावीवाले आहेत. चर्चगेट ते माटुंगा, माटुंगा ते राम मंदिर, राम मंदिर ते भाईंदर व भाईंदर ते विरारपर्यंत चावीवाल्यांची फौज मुंबईकरांची लाइफलाइन विनाअडथळा सुरू ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावते. "नव्या बॅगांमुळे सामानाचे जवळपास पाच किलो वजन कमी झाले आहे,' असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.