इमारत कोसळून भिवंडीत तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

भिवंडी - भिवंडी शहरातील नवीवस्ती येथील वन जमिनीवर आठ वर्षांपूर्वी बांधलेली चार मजली इमारत आज सकाळी कोसळून तिघा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना ठाणे येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी - भिवंडी शहरातील नवीवस्ती येथील वन जमिनीवर आठ वर्षांपूर्वी बांधलेली चार मजली इमारत आज सकाळी कोसळून तिघा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना ठाणे येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या नवीवस्ती येथील स्वच्छतागृहाशेजारी वन विभागाच्या 511 व 511/1 या दोन झोपड्यांच्या जागेवर ताहीर रफीक अन्सारी याने आठ वर्षांपूर्वी चार मजल्यांची आरसीसी इमारत बांधली होती. या इमारतीत प्रत्येक मजल्यावर एक कुटुंब राहत होते; तर टेरेसवरही काही कुटुंबांना राहण्यासाठी जागा दिल्या होत्या. सुदैवाने दोन कुटुंबे बाहेरगावी गेल्यामुळे मोठी मनुष्यहानी टळली.

आज सकाळी इमारतीच्या भिंतीला अचानक भेगा पडून जोरदार आवाज झाला. त्यानंतर इमारत कोसळली. मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. त्यानंतर लगेचच पालिकेला माहिती कळविण्यात आली. या परिसरात अरुंद रस्ता असल्याने गाड्या व कर्मचाऱ्यांना पोचण्यास अडचणी आल्या. त्यानंतर महापालिकेचे अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी मदतकार्य सुरू केले. काही वेळानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरए) जवान दाखल झाल्यानंतर ढिगाऱ्याखालून सात जणांना बाहेर काढण्यात आले. त्यात तीन मृतदेहांचा समावेश होता.

रुक्‍सार याकूब खान (वय 19), अश्‍फाक अहमद खान (वय 40) आणि जैबुन्निसा रफीक अन्सारी (वय 35) अशी मृतांची नावे आहेत.

सरकारी यंत्रणांकडे दुर्लक्ष
वन विभागाच्या जागेवर उभारलेल्या इमारतीकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याचे घटनास्थळी पाहणीस गेलेल्या पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आढळले. आठ वर्षांपूर्वीच उभारलेल्या इमारतीची माहिती प्रभाग अधिकारी सुनील भोईर यांच्याकडे उपलब्ध नव्हती. त्यांनी आपण काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारल्याचे सांगत जबाबदारी झटकली; तर प्रभारी महापालिका आयुक्त अशोक रणखांब यांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.

भिवंडीतील बहुसंख्य वन जमिनीवर अनधिकृतपणे इमारत व बंगले उभारण्यात आले आहेत; मात्र याबाबत अधिकाऱ्यांकडून मूक भूमिका बजावली जात आहे.
- महेश चौघुले, आमदार, भाजप

Web Title: bhivandi mumbai news three death in building colapse