''काँग्रेसच्या पराभवाची चर्चा खुल्या मैदानात करा''

कुणाल जाधव
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबईतील निकालानंतर प्रसारमाध्यमांच्या मदतीने पराभवाचे खापर माझ्यावर फोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच मौन सोडण्याची वेळ आली आहे. या पराभवाला नेमके कोण जबाबदार आहे, हे ठरविण्यासाठी खुली चर्चा गरजेची आहे. 
- गुरुदास कामत, माजी केंद्रीय मंत्री

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 'पानिपत' झाल्यावरही पक्षांतर्गत राजकारण काही केल्या थांबताना दिसत नाही. निवडणुकीतील कामगिरीचा अहवाल घेऊन मुंबई प्रदेश अध्यक्ष दिल्लीत उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. मात्र, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांनी या 'चार भितींआड'च्या पराभवाच्या चर्चेला हरकत घेतली आहे. निरुपम यांनी निवडणुकीच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी खुल्या मैदानात सामान्य कार्यकर्त्यांसमोर खुली चर्चा करण्याचे आवाहनच कामत यांनी केले आहे. या चर्चेअंती पराभवाची जबाबदारीही निश्‍चित करता येईल, असे कामत यांचे मत आहे. 

काँग्रेस हायकमांडकडे वारंवार नाराजी प्रकट करुनही पक्षाकडून दुर्लक्षित केले गेलेले गुरुदास कामत आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यातील वाद काही नवा नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर हा वाद संपुष्टात येण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र, आता हा वाद आणखीनच उफाळून आला आहे. मुंबईच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी निरुपम यांनी दिल्लीत 'तळ' ठोकला असताना गुरुदास कामत यांनी निरुपम यांना थेट 'आव्हान' दिले आहे.

'पराभवाची चर्चा बंद दरवाज्याआड करण्याऐवजी ती खुल्या मैदानात सर्व नेते आणि सामान्य कार्यकर्त्यांसमोर केली तर त्यातून प्रत्येकला आपल्या चुका कळतील. त्यासाठी ही चर्चा एखाद्या मोठ्या सभागृहात किंवा खुल्या मैदानात करावी, अशी विनंती करणारे पत्र कामत यांनी निरुपम यांना पाठविले आहे. हेच पत्र त्यांनी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडेही पाठविले असून या खुल्या चर्चेसाठी कामत आता आक्रमक झाले आहेत.

प्रसारमाध्यमे आणि हायकमांडसमोर पराभावाची खोटी चर्चा केली जात आहे, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेतील निर्णय नेमके कोणी व कसे घेतले? यामागे काय कारणे होती? याची सविस्तर चर्चा पक्षाच्या कार्यकारी समितीत व्हायला हवी, असेही या पत्रातून कामतांनी सूचित केले आहे. या चर्चेला सामान्य कार्ययकर्तेही उपस्थित राहिले तर त्यांना नेमके काय चुकले याचे उत्तर मिळू शकेल. शिवाय त्याच्या मनातील संभ्रम नाहीसा होईल, असे कामतांचे म्हणणे आहे.

या चर्चेला राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनाही पाचरण करण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे. आता या पत्राला निरुपम उत्तर देणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्षित करणार? हे लवकरच स्पष्ट होईल. याविषयी निरुपम यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी वारंवार फोनवरुन संपर्क करुनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.