रस्त्यांचे काम थांबल्याने आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

रस्त्यांच्या कामासाठी लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्या खाणी सुरु करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई - क्वॉरीचे काम थांबविल्यामुळे रस्त्यांची कामे, पावसाळ्यापूर्वीची पालिकेची कामे यासाठी लागणाऱ्या साहित्यांचा तुटवडा भासत असल्याने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीही या प्रश्नी तोडगा काढणार असल्याचे सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेना नेत्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. रस्त्यांच्या कामासाठी लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्या खाणी सुरु करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

या भेटीनंतर ट्विटवर माहिती देताना त्यांनी सांगितले, की मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई महापालिकेला रस्त्यांची सर्व कामे संपवायची आहेत. कच्च्या मालाशिवाय ही कामे पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे रस्त्यांचा प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो होते. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला मुंबई महापालिकेला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्त्यांचे काम व्यवस्थित होणार आहे.