कसलेला शॅगी पोलिसांपुढे कूल... कूल!

कसलेला शॅगी पोलिसांपुढे कूल... कूल!

ठाणे - सागर ऊर्फ शॅगी ठक्कर... मिरा रोडमधील बोगस कॉल सेंटरद्वारे अमेरिकेतील अनेक नागरिकांना करचुकवेगिरीबद्दल धमकावून गंडवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी. ठाणे पोलिसांच्या ताब्यात आलेल्या या शॅगीची पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी खास पोलिसी खाक्‍यात तब्बल तासभर झाडाझडती घेण्याचा प्रयत्न केला; पण बर्फासारखा ‘कूल’ राहिलेल्या शॅगीने आपले पाताळयंत्री व्यक्तिमत्त्व पाण्यातल्या हिमनगासारखे दडवून ठेवले. हे पाणी वेगळेच आहे, इतकाच निष्कर्ष तूर्तास काढून पोलिस आयुक्तांनी आता त्याची सगळी कुंडली मांडण्याची तयारी सुरू केली आहे.  

शॅगी म्हणजे सायबर गुन्ह्यांच्या दुनियेतला कसलेला खिलाडी असल्याचे पोलिसांचे मत बनले आहे. त्याला अमेरिका आणि भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संगणक प्रणालीची पुरेपूर माहिती आहेच, शिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पुरेपूर ज्ञानही आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत इतकी हुशार आणि माहीतगार व्यक्ती पाहण्यात आली नाही, असे आयुक्तांनीच सांगितले! त्याच्यासोबतच्या केवळ एका तासाच्या बोलण्यामधून तो गुन्हेगार आहे, असे कोणालाही वाटणार नाही; मात्र आम्ही त्याच्या प्राथमिक बोलण्यावर विश्‍वास ठेवणार नाही. त्याची कसून चौकशी केली जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

शॅगी ठक्करने पोलिसांना दाखवलेल्या ‘ॲटीट्यूट’ने सगळेच अवाक्‌ झाले आहेत. मिरा रोड बोगस कॉल सेंटर प्रकरणात फरारी असलेल्या सागरला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्याचे पाणी जोखण्याचा प्रयत्न केला. ठक्करला मुंबई विमानतळावर ब्युरो ऑफ इमिगेशन आणि सीएसआय एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रेड कॉर्नर नोटिशीच्या भीतीने तो दुबईतून भारतात परतला आहे. 

ठक्करने वयाच्या पंधराव्या वर्षी वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्या अनुभवातूनच त्याने बोगस कॉल सेंटरचा ‘धंदा’ सुरू केला. भारतीय आणि अमेरिकन कायदे, महिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संगणक प्रणालीची माहिती घेतल्यामुळे त्याच्या या कॉल सेंटरचे जाळे वाढत गेले. त्याचे काही मित्र त्याला सामील झाले. त्याचा हा व्यवसाय चांगलाच फोफावला, अशी माहिती आयुक्तांनी दिली. सिंग यांनी झाडलेल्या प्रश्‍नांच्या फैरीतून सागर ठक्करने सफाईदारपणे आपला बचाव केला. त्यामुळे तो एक सर्वसामान्य तरुण वाटतो, असे त्यांनी सांगितले. 

आपल्याकडे जास्त पैसेच नसल्याची बतावणी शॅगीने केली आहे. अर्थात त्याच्या बोलण्यावर आमचा विश्‍वास नाही, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी अद्याप फरारी असलेल्या आरोपींपैकी तवेश गुप्ता हा ठक्करला अमेरिकेतील नागरिकांचे फोन नंबर मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असे. परदेशातील काही व्यक्तीही या प्रकरणात गुंतल्या असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

नातेवाईकांच्या संपर्कात
सागर ठक्करचे भारतातील बोगस कॉल सेंटरचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्याने दुबईमध्ये पलायन केले होते. तेथे तो एका नातेवाईकाच्या संपर्कात होता, असे समजते. त्याच्या कृत्यांची माहिती होताच त्यांनी त्याला तेथून बाहेर काढले. सागरच्या मैत्रिणीनेही त्याला भारतात परत येण्याविषयी बजावल्याचे समजते; मात्र त्याविषयी बोलण्यास पोलिसांनी नकार दिला. 

काय आहे प्रकरण?
- मिरारोड परिसरात काही व्यक्ती बनावट कॉल सेंटरद्वारे परदेशी नागरिकांची फसणवूक करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती.
- ऑक्‍टोबरमध्ये पोलिसांनी हरीओम आय.टी. पार्क बिल्डिंग, ओसवाल पॅरेडाईज आणि एमबाले हाऊस या ठिकाणी छापा टाकून कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.
- या कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांना इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे अधिकारी असल्याचे सांगून टॅक्‍स डिफॉल्टर असल्याची धमकी दिली जात होती. या प्रकरणी अटक होऊन शिक्षा होईल, असे सांगून अमेरिकन नागरिकांकडून आयट्युन कार्डस, टारगेट कार्डस, व्हेनिला कार्डस, मनीग्रामच्या माध्यमातून व रोख स्वरूपात कोट्यवधी यु.एस. डॉलरची मागणी करून फसवणूक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com