मुलींपेक्षा मुलांवर अधिक हिंसाचार 

मुलींपेक्षा मुलांवर अधिक हिंसाचार 
मुलींपेक्षा मुलांवर अधिक हिंसाचार 

सर्वेक्षणात मुलांचे मत: आम्ही सुरक्षित नाहीत 

मुंबई :  मुलींवरील हिंसाचाराबाबत नेहमी चर्चा होते; पण मुलेही मोठ्या प्रमाणात हिंसेचे बळी ठरत असल्याचे युनिसेफच्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. सर्वेक्षणात मुलांना स्वत:चे राहते घरही असुरक्षित वाटत असल्याचे मत मुलांनी मांडले आहे. अशा प्रकारचा हिंसाचार थांबविण्याच्या प्रक्रियेत मुलांचा समावेश असावा, या उद्देशाने महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांत युनिसेफकडून सर्वेक्षण करण्यात आले. यात मुलांनी घरसुद्धा असुरक्षित असल्याचे सांगितले. 


मुलांवर होणाऱ्या हिंसाचाराची सुरुवात कुटुंबातूनच होते. लहानपणी आई-बाबांचे रागवणे, मारणे, ओरडणे, आजी आणि आईमधील भांडणे यामुळे मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते, असे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. हिंसाचाराची माहिती घेण्यासाठी शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचारांबरोबर दुर्लक्ष करणे या बाबी यातून तपासण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे, मुलांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराकडे दुर्लक्ष करणे आवश्‍यक असल्याचे मत 64 टक्के मुलांनी व्यक्त केले. जातीबाबत माहिती देणे 15 टक्के मुलांनी टाळले. 


मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. 13 ते 17 वयोगटातील मुलांची माहिती कथा, सादरीकरण आणि प्रश्नोत्तरांतून घेण्यात आली. विद्यार्थी, शाळाबाह्य मुले, आश्रमशाळा, काही संस्था अशा एकूण पाच हजार मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. युनिसेफ, मुंबई स्माईल्स यांनी नाईन इज माईन या प्रकल्पांतर्गत सप्टेंबर 2015 ते एप्रिल 2016 दरम्यान हे सर्वेक्षण केले. 


सर्वेक्षणातील एकूण विद्यार्थी 
शालेय विद्यार्थी - 41.63 टक्के 
शाळाबाह्य मुले - 38.95 टक्के 
आश्रमशाळेतील विद्यार्थी - 2.04 टक्के 

घरात होणारा लैंगिक अत्याचार 
वडील : 10 टक्के 
भाऊ : 8.5 टक्के 
काका : 7 टक्के 
आजोबा : 6 टक्के 
 

शाळेतील हिंसाचाराचे प्रमाण 

एखादी वस्तू मारणे : 16.60 टक्के 
वर्गाबाहेर उभे करणे : 14.77 टक्के 
कानाखाली मारणे : 5.57 टक्के 
कान पिरगळणे : 4.75 टक्के 
मारणे : 2.28 टक्के 

समाजातील असुरक्षितता 
शारीरिक इजा होण्याची भीती -17 टक्के 
स्वच्छतागृह नसणे - 21 टक्के 
लैंगिक अत्याचार - 21 टक्के 
व्यसनी माणसांनी धमकावणे - 22 टक्के 
विजेची सोय नसणे - 15 टक्के 
दारूच्या दुकानांची भीती - 15 टक्के 
विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार - 35 टक्के 
अश्‍लिल व्हिडीओ, फोटो दाखवणे - 6 टक्के 
पुरुष शिक्षकांकडून लैंगिक अत्याचाराचे प्रमाण अधिक 


मुलांवर सर्वाधिक हिंसाचार 
मुलींपेक्षा मुलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यांना मारल्याने ते अधिक ताकदवान होतात. किंबहुना यातून पुरुष होण्याच्या प्रक्रियेत मदत होत असल्याचा समज आजही समाजात कायम आहे. मुलांना (65 टक्के) मुलींपेक्षा (31 टक्के) अधिक लाज वाटते. झालेल्या अत्याचाराबद्दल मुले (51 टक्के) मुलींपेक्षा कमी बोलतात. 

शाळांमध्ये होणारी शिक्षा 
मुलांना होणाऱ्या शिक्षेची जातनिहाय वर्गवारीही सर्वेक्षणात देण्यात आली. वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षा होणाऱ्या मुलांमध्ये अनुसूचित जाती-जमातीतील मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्याचे प्रमाण 9.5 टक्के एवढे आहे. 

अत्याचाराचे जातनिहाय प्रमाण 
खुला वर्ग - 33 टक्के 
अनुसूचित जाती - 13 टक्के 
अनुसूचित जमाती - 26 टक्के 
ओबीसी - 15 टक्के 


जातनिहाय मानसिक हिंसाचार 
बालकांच्या समस्यांवर युनिसेफची आमदारांशी चर्चा सुरू आहे. आमदारांनी याबाबत अस्वस्थता व्यक्त केली. बालकांच्या प्रश्नांबाबत आपापल्या मतदारसंघात आमदार अत्यंत सजग असतात; मात्र बालकांसाठी एखाद्या धोरणाचा विषय येतो तेव्हा त्यांची संवेदनशीलता समान नसते. 
- मेधा कुलकर्णी, संपर्क, युनिसेफ 


मुलांना रागावणे चुकीचे नाही. योग्य पद्धतीने आणि चांगल्या शब्दांत त्यांना रागवणे गरजेचे आहे. याला आम्ही "टोकन ईकॉनॉमी' असे म्हणतो. एखादी गोष्ट न केल्यास काहीतरी देण्याचे मुलांना आश्वासन दिले, तर ते ऐकतात. दोन ते तीन वेळा मुलांना रागवले पाहिजे. 
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ, के. ई. एम. रुग्णालय 

मुलांचे सर्वेक्षण करताना जात किंवा धर्म असे काही डोक्‍यात नव्हते. वर्गवारी करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. या सर्वेक्षणानंतर मुंबई (संस्था), रायगड (शाळा), जालना (आदिवासी भागातील मुले) आणि यवतमाळ (आश्रमशाळा) असे चार वेगवेगळ्या स्तरांवर मुलांमध्ये नेतृत्त्व विकासासाठी काम सुरू करण्यात आले आहे. 
- साराह फर्नांडिस, उपक्रम प्रमुख, प्रत्येक संस्था 

अशाच प्रकारचा सर्व्हे राज्य सरकारने करण्याची गरज आहे. भौगोलिक परिस्थिती, लोकजीवन, आर्थिक स्तर या बाबी विचारात घेऊन धोरणे ठरविण्याची प्रक्रिया राबविली पाहिजे. समाजातील सर्व स्तरासाठी हा प्रयोग लगेच शक्‍य होणार नाही; मात्र मुलांच्या भवितव्यासाठी असे करणे गरजेचे आहे. 
- हेमंत कर्णिक, सामजिक कार्यकर्ता, संपर्क संस्था 

घरातील असुरक्षितता 
अनेक मुलांनी हिंसाचाराची सुरुवात घरातून झाल्याचे सांगितले. फार लहानपणीच त्यांच्याबरोबर हिंसाचार झाल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. वडिलांपेक्षा आई जास्त मारते, असे मुलांचे म्हणणे आहे. 

घरातील भावना 
घरात आनंदी वाटते - 68.27 टक्के 
घरात दुःखी वाटते - 11.16 टक्के 
घराची भीती वाटते - 6.73 टक्के 
घरात चिंता वाटते - 6.65 टक्के 
घरात राग येतो - 6.35 टक्के 
घरात असाह्य वाटते - 2.76 टक्के 

आईकडून मार - 25 टक्के 
वडिलांकडून मार - 21 टक्के 
कानाखाली मार - 25 टक्के 
मारणे - 17 टक्के 
कान पिरगळणे, ढकलणे - 6 टक्के 
चटके देणे - 2 टक्के 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com