अध्यक्षपदाबाबत अशोक चव्हाण घेणार अंतिम निर्णय

- कुणाल जाधव
शनिवार, 4 मार्च 2017

थोरात आणि विखे पाटील गट आमने-सामने

थोरात आणि विखे पाटील गट आमने-सामने
मुंबई - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील अंतर्गत वादामुळे नगर जिल्हा परिषदेची निवडणूक चांगलीच गाजली. दोन दिग्गजांच्या भांडणातही जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची सत्ता कायम राहिली आहे. एकमेकांवर विखारी टीका करणाऱ्या या नेत्यांनी अध्यक्षपद आपल्याच समर्थकांना मिळावे, यासाठी आता आग्रह धरला आहे. यातून मार्ग निघत नसल्याने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापर्यंत हा वाद पोचला आहे. उद्या (ता. 4) मुंबईच्या टिळक भवनात होणाऱ्या आढावा बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

नगर जिल्ह्यावर आपले वर्चस्व टिकविण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात नेहमीच कुरघोडी सुरू असते. 16 फेब्रुवारीला झालेल्या नगरच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हा वाद पुन्हा उफाळून आला. विखे-पाटीलांना शह देण्यासाठी थोरातांनी आश्‍वी आणि जोर्वे या दोन गटांत अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरांना रिंगणात उतरविले होते. यातील जोर्वे गटात बंडखोर उमेदवाराचा विजयही झाला. या अंतर्गत वादानंतरही कॉंग्रेसला 73 पैकी 23 ठिकाणी विजय मिळाला. राज्यभरात आघाडीचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीच्या 18 सदस्यांचीही यात भर पडली आहे; मात्र आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणाला करायचे यावरून थोरात आणि विखे पाटीलांमध्ये जुंपली आहे. पत्नी आणि माजी अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील यांना हे पद मिळावे, यासाठी विखे-पाटील आग्रही आहेत. थोरात गटाकडून अनुराधा नागवडे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे करण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर हा वाद मिटत नसल्याने मुंबईत होणाऱ्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्षांकडून अध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कमोर्तब करण्यात येणार आहे. आता अध्यक्षांच्या निर्णयाचा मान राखून 21 मार्चची निवडणूक सुरळीतपणे पार पडणार की पुन्हा नवा कलगीतुरा रंगणार, याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

नवनिर्वाचित सदस्य, दोन्ही दिग्गज नेते आणि इतर पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांना बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या आढावा बैठकीत अशोक चव्हाण यावर निर्णय घेतील.
- जयंत ससाणे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष