म्युच्युअल फंडावर बोनस देण्याच्या नावाखाली गंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

दिल्लीतील दोन भामट्यांना अटक; तिघे जण फरारी
मुंबई - म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली 83 वर्षीय वृद्धाला आठ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना काळाचौकी पोलिसांनी नुकतीच दिल्लीत अटक केली. आरोपींनी बोनस रक्कम देण्याचे प्रलोभन दाखवून ही फसवणूक केली.

परळ परिसरातील ज्येष्ठ नागरिकाने सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम विविध म्युच्युअल फंडांत गुंतवली होती. 2016 मध्ये पैसे गुंतवलेल्या ठिकाणाहून बोलत असल्याचे सांगत एका व्यक्तीने दिल्लीतून या नागरिकाला फोन केला. गुंतवलेल्या पैशांवर 19 लाख 69 हजारांचा बोनस देण्यात येणार असल्याचे दुसऱ्याने सांगितले. मात्र ही रक्कम हवी असल्यास सेवाकर म्हणून 10 टक्के रक्कम म्हणजेच 1 लाख 96 हजार रुपये एका खात्यावर भरण्यास सांगितले. वृद्धाने त्या खात्यावर ही रक्कम भरली. खात्री पटावी यासाठी भामट्यांनी संबंधित कंपनीचा बनावट ई-मेल आयडी आणि लेटरहेडचा वापर केला. खात्री पटल्यानंतर दुसऱ्या ठेवीसाठी त्यांनी 3 लाख भरण्यास सांगितले. अशा प्रकारे एकूण 7 लाख 92 हजार रुपये उकळण्यात आले. पैसे भरूनही बोनसची रक्कम न मिळाल्याने चौकशी केल्यावर अशी कोणतीही रक्कम देण्यात आली नसल्याचे त्यांना समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धाने काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. भामट्यांनी संबंधित म्युच्युअल फंडाच्या नावाने बनावट वेबसाईट बनवून विविध खात्यांवर जमा केलेल्या पैशांविषयीची माहिती पोलिसांनी गोळा केली. त्याद्वारे पोलिसांनी नीरजकुमार त्रिभुवन प्रसाद आणि अजयकुमार शिवनाथ राम यांना अटक केली. त्यांचे तीन साथीदार फरारी आहेत.