मुंबई विद्यापीठात लवकरच चिनी भाषेचा पदवी अभ्यासक्रम

नेत्वा धुरी
गुरुवार, 30 मार्च 2017

अभ्यासक्रमासाठी जर्मन विभागाचा प्रस्ताव

अभ्यासक्रमासाठी जर्मन विभागाचा प्रस्ताव
मुंबई - चिनी भाषेचा वाढता प्रभाव आणि ही भाषा जाणणाऱ्यांना वाढती मागणी लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठात लवकरच चिनी साहित्यावरील पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. जूनमध्ये बीए (इन चायनीज) सुरू करण्याचा प्रस्ताव जर्मन विभागाने विद्यापीठ प्रशासनाला पाठवला आहे. तो मंजूर झाल्यास चिनी अभ्यासक्रमाची पदवी देणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले ठरेल.

100 वर्षांहून जुने असलेल्या जर्मन विभागात दर रविवारी विविध परदेशी भाषांचे अभ्यासक्रम शिकवले जातात. येथे अल्पावधीत चिनी भाषा शिकायला मिळालेला प्रतिसाद पाहता या भाषेबद्दलची इत्यंभूत माहिती देणारा अभ्यासक्रम सुरू करण्याची संकल्पना पुढे आल्याचे चायनीज कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. विभा सुराणा यांनी सांगितले.

नोकरीच्या वेगवेगळ्या संधी पाहता परदेशी भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या तरुणांना मोठी मागणी आहे. चिनी भाषा सांकेतिक असली तरीही ती जाणणाऱ्यांना मागणी आहे. शिवाय, अर्थार्जनाचे साधन म्हणून या भाषेकडे पाहिले जाऊ लागले आहे. आर्थिक बाजारातील घडामोडी पाहता चिनी भाषेची पदवी देण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. सुराणा म्हणाल्या. यूजीसी प्रमाणपत्र असलेले चिनी भाषेचे तज्ज्ञ पदवी अभ्यासक्रमासाठी नेमले जातील. कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल, अशी माहितीही विद्यापीठातून देण्यात आली.

अभ्यासक्रमात काय असेल?
- चिनी भाषेची संस्कृती, नागरी संस्कृती
- चिनी भाषेची सध्याची स्थिती
- पूर्व आशिया व चीनचा इतिहास
- भाषांतर, विविध प्रकल्प, विद्यार्थ्यांना इंटर्नशीप
- चिनी भाषेतील वृत्तपत्रांचे वाचन

Web Title: chin language degree syllabus in mumbai university