मुंबई महापालिकेसाठी आता समिती आणि उपलोकायुक्तही

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - शिवसेनेचे 84 आणि भाजपचे 82 या तिढ्यात महापौरपद मिळवण्याएवढे बळ भाजपला मिळालेले होते; मात्र कोणत्याही पक्षाशी तडजोड करणे जनतेच्या कौलाचा अनादर करणारे असेल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजप महापौरपद आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा किंवा इतर समित्यांचे प्रमुख होण्याचेही भाजपचा विचार नसल्याचे सांगत महापालिकेतील पारदर्शी कारभारासाठी समिती स्थापन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी याचवेळी सांगितले. गौतम चॅटर्जी, शरद काळे आणि रमानाथ झा यांचा समावेश असलेली ही समिती पारदर्शी कारभारासाठी लवकरच बैठका सुरू करणार असून, मुंबईच्या कारभारात पारदर्शिता आणण्यासाठी उपलोकायुक्त नेमण्याची घोषणाही त्यांनी आज केली.

स्थायी समितीत तसेच अन्य सर्व समित्यांमध्ये भाजपला शिवसेनेप्रमाणेच दहा-दहा जागा मिळणार असल्या तरीही कोणत्याही समितीचे अध्यक्षपद भाजप स्वीकारणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. पारदर्शीपणाचा अजेंडा मुंबईने स्वीकारला असून, जनतेचा हा विश्‍वास सार्थ ठरवण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले. जोडतोड करून मिळणाऱ्या बहुमतात आम्हाला कोणताही रस नाही; मात्र त्याचवेळी विरोधी पक्षात न बसता आम्ही जनतेची कामे करू, असे ते म्हणाले. विरोधी पक्षात न बसता पारदर्शी अजेंडा राबवण्याची क्षमता कशी काय असू शकेल, या प्रश्‍नावर उत्तर देताना त्यांनी हे आम्ही शक्‍य करून दाखवू, असे स्पष्ट केले. मुंबई महापालिकेवर निवडून आलेले आमचे नगरसेवक पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम पाहतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पक्षातील दहा आमदार बाजूला घेऊन सरकार चालवण्यापेक्षा सेफ खेळत मुंबई शिवसेनेकडे सोपवण्याचा निर्णय आज घेण्यात आला; मात्र त्याचवेळी उपलोकायुक्त आणि समिती नेमत भाजपने मोठ्या भावाची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे शिवसेनेवर भाजपच्या कृपेची तलवार कायम राहील, असे सांगत अन्य महापालिका आणि जिल्हा परिषदेत शिवसेनेला बरोबर यावे लागेल, असे सुचवले गेले आहे. शिवसेनेला डिवचून राज्य सरकार अस्थिर होऊ न देण्याचा निर्णय घेतानाच मुख्यमंत्र्यांनी मोठी खेळी केली, असे मानले जात असून निवडणुकीनंतर तहात मुंबई शिवसेनेकडे राहू देण्याचाच निर्णय घेतला आहे.

Web Title: committee & dy. public commission for mumbai municipal