उमेदवारांच्या "भाषणबाजी'ची पाठशाळा! 

उमेदवारांच्या "भाषणबाजी'ची पाठशाळा! 

मुंबई - "बोलणाऱ्यांची मातीही खपते; न बोलणाऱ्याचे सोने खपत नाही', असे बोलले जाते. राज्यभर निवडणुकांची धामधूम सुरू असल्याने उमेदवारांनीही ही म्हण मनावर घेतल्याचे दिसते. मतदारांवर छाप पाडण्यासाठी, त्यांच्यासमोर आत्मविश्‍वासाने बोलता यावे, यासाठी जिल्हा परिषदेपासून नगरसेवक पदापर्यंतचे अनेक उमेदवार सध्या "कम्युनिकेशन स्कील डेव्हलप' करण्याचे अर्थात "भाषणबाजी'चे धडे गिरवताना दिसत आहेत. त्यामुळे असे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना सुगीचे दिवस आले आहेत. 

जिल्हा परिषद, नगरपालिका असो किंवा महापालिका निवडणूक; पूर्वी कार्यकर्त्यांतून नेता तयार होत असे. त्यामुळे नागरिकांशी बोलण्याचा, त्यांच्याशी त्यांना आवडेल अशा भाषेत संवाद साधण्याची किमया या नेत्यांना अवगत होती. मात्र सध्या "हवश्‍या-नवश्‍यां'प्रमाणेच नेत्यांच्या नातेवाइकांनाही निवडणुकीत उमेदवारी मिळू लागली आहे. त्यामुळे साहजिकच मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी व्यक्तिमत्त्वात बदल करणे, बोलण्याची पद्धत बदलणे, 10 जणांच्या घोळक्‍यात आणि प्रत्यक्ष 500 च्या वर नागरिक असलेल्या प्रचारसभेत बोलण्याची पद्धत वेगळी आहे. त्यातही मतदारांना बोलण्यात गुंतवून ठेवण्यासाठी प्रभावी वक्तृत्वाची गरज आहे. यासाठी ठिकठिकाणच्या व्यक्तिमत्त्व विकास, "व्हॉईस गुरूं'ची मदत घेतली जात आहे. त्यात उभे कसे राहावे, मतदारांशी संवाद कसा साधावा इथपासून गर्दीसमोर भाषण कसे करावे, शब्दांचा जोर, आवाजातील बदल, आत्मविश्‍वास आदी धडे दिले जात आहेत. प्रचारातील धावपळीतूनही अनेक जण प्रशिक्षणासाठी आवर्जून वेळ काढत आहेत. 

निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच अनेक इच्छुक उमेदवारांनी वक्तृत्व कलेचे प्रशिक्षण घेण्याची सुरुवात केली आहे. त्यात अगदी जिल्हा परिषद अध्यक्षांपासून नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारही आहेत. एकूणच या कालावधीत 30 ते 40 जण प्रशिक्षण घेत आहेत. नवी मुंबईच्या विमल भोईर, प्रीती सातव आदी प्रशिक्षण घेत आहेत. केवळ निवडणुकीपुरतेच नव्हे, तर निवडून आल्यानंतर सभागृहात कसे बोलावे, याचेही प्रशिक्षण ही मंडळी घेत आहेत. 
- शेखर कुंटे, व्हॉईस गुरू. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com