स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी शास्त्रज्ञाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

मानखुर्द - स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी मुले मागे पडतात. त्यामुळे सरकारदरबारी उच्च पदांवर मराठी मुलांची संख्या कमी असते. ही बाब लक्षात घेऊन भाभा अणुसंशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ सुरेश टकले यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी अभ्यास केंद्राची व्यवस्था केली आहे. यामध्ये राहण्याच्या सुविधेसोबतच, विद्यार्थ्यांद्वारे संचालित खानावळ, ग्रंथालय, इंटरनेट, व्याख्याने व मनोरंजनाच्या सुविधा पुरवल्या आहेत. 

गुणवंत, गरजू स्पर्धा परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी सुरेश टकले यांनी पनवेलपासून जवळ असलेल्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण या जन्मगावी ही सुविधा उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे टकले यांचे निवासस्थानही याच गावात आहे. स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा अनेकांनी उराशी बाळगलेली असते. परिस्थितीमुळे अनेकांना ते शक्‍य होत नाही. अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी संतोष टकले यांच्या ‘टकले चॅरिटेबल ट्रस्ट’मार्फत विद्यार्थ्यांना मोफत निवासी अभ्यास केंद्र सुरू केले आहे. त्यामध्ये राहण्याच्या सुविधेसोबतच, विद्यार्थ्यांद्वारे संचालित खानावळ, ग्रंथालय, इंटरनेट, व्याख्याने व मनोरंजनाच्या सुविधा पुरवल्या जातात. बारावी किंवा विशेष परिस्थितीत दहावी उत्तीर्ण मुले व मुलींमधून ३५ जणांची निवड केली जाते. प्रवेशासाठी तीन महिन्यांचा चाचणी कालावधी व निवडीचे पाच टप्पे पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जातो. तीन वर्षे या अभ्यास केंद्रात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यात येते. विद्यार्थ्यांना नोकरी लागल्यावर मात्र त्यांनी त्यांच्या शिक्षण काळात टकले चॅरिटेबल ट्रस्टने केलेला खर्च बिनव्याजी परत करावा ही अट आहे. इच्छुकांनी santoshatbarc@gmail.com या ई-मेल वर किंवा ७७३८९८४८५२ किंवा ९९६७५८४५५४ या क्रमांकावर निवड होण्यासाठीचा हेतू व बायोडेटा पाठवावा, असे आवाहन संतोष टकले यांनी केले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून मुलाखतीसाठी बोलवले जाईल.