कॉंग्रेसचे लक्ष दलित व्होट बॅंकेवर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपपासून दुरावलेली दलितांची व्होट बॅंक कॅश करण्याचा संकल्प कॉंग्रेसने केला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईत ठिकठिकाणी रोड शो करण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी (ता. 2) घाटकोपरमधील रमाबाई कॉलनीत रोड शो करण्यात आला. 

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपपासून दुरावलेली दलितांची व्होट बॅंक कॅश करण्याचा संकल्प कॉंग्रेसने केला आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईत ठिकठिकाणी रोड शो करण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी (ता. 2) घाटकोपरमधील रमाबाई कॉलनीत रोड शो करण्यात आला. 

मुंबईतील पालिकेच्या 227 प्रभागांपैकी किमान 60 प्रभागांमध्ये दलितांचे प्राबल्य आहे. काही वर्षांपूर्वी ही मते कॉंग्रेसच्या हक्काची समजली जात; मात्र दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत या समाजाने भाजपच्या पारड्यात मते टाकली. त्यामुळे मुंबईतून कॉंग्रेसचा एकही खासदार निवडून आला नाही. विधानसभेतही पक्षाचे अवघे पाच आमदार निवडून आले; मात्र गोहत्या बंदी, गुजरातमध्ये दलितांवर झालेला हल्ला आदी कारणांमुळे हा समाज भाजपवर नाराज आहे. पालिकेने फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईलाही भाजपने समर्थन दिले होते. या फेरीवाल्यांमध्ये उत्तर भारतातील बहुसंख्य दलित वर्गाचा समावेश आहे. या कारवाईमुळे ही मते भाजपपासून दुरावण्याची शक्‍यता आहे.
 

ही नाराजी कॅश करण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. त्यासाठी घाटकोपरमधील रमाबाई कॉलनीत कॉंग्रेसने शुक्रवारी रोड शो केला. पालिकेच्या कारभाराविरोधात टप्प्याटप्प्याने हे शो होणार असले तरी ते करताना दलितबहुल भागांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. शहरातील 60 प्रभागांमध्ये दलितांची एकगठ्ठा मते असून अन्य किमान 50 प्रभागांत दलितांची मते विजयासाठी निर्णायक ठरू शकतात. या मतांच्या जोरावर पालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे पद टिकवून ठेवण्याचा कॉंग्रेसचा विचार आहे. कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने या वृत्तास दुजोरा दिला.
 

मुंबईत 94 लाख मतदार
दलित मतदार ः 16 ते 17 टक्के
60 प्रभागांमध्ये दलित मतांचे वर्चस्व
50 प्रभागांत दलितांची मते निर्णायक
 

दलितबहुल भाग
घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, कुर्ला-पश्‍चिम, धारावी, वडाळा, नायगाव, वरळी, गोरेगाव, जोगेश्‍वरी, मालाड.