गुन्हेगार करणार पुनर्विचार याचिका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचीही शक्‍यता

राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचीही शक्‍यता
मुंबई - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम केल्यामुळे चारही आरोपींनी तुरुंगातील काम थांबवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत फाशीवर शिक्कामोर्तब केल्याने आता या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यासाठी चारही आरोपींचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात लवकरच हे आरोपी पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत. फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी आरोपी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याच्या विचारातही असल्याचे आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी सांगितले.

आरोपींपैकी अक्षय ठाकूर, पवन कुमार आणि मुकेश कुमार हे तिहारमधील क्रमांक दोनच्या तुरुंगात असून, विनय शर्मा सात क्रमांकाच्या तुरुंगात आहे. अक्षय ठाकूर तुरुंगातील पिठाच्या गिरणीत काम करत होता. पवन हा कॅन्टीनमध्ये आणि मुकेश हाउसकीपिंगचे काम करत होता. फाशीची शिक्षा कायम केल्यानंतर त्यांनी काम थांबवले आहे. विनय पदवी परीक्षेचा अभ्यास करत असल्यामुळे तो काम करत नव्हता. आधी ते सोबतचे कैदी आणि तुरुंग अधिकाऱ्यांसोबत बोलत असत. आता ते फारसे कुणासोबत बोलतही नाहीत. तिहार तुरुंगातील प्रत्येक कैद्याला काम करण्याची संधी दिली जाते. त्याचा त्यांना दररोज 300 रुपये मेहनताना दिला जातो.

आरोपींना ठोठावलेल्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा, यासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे. ती फेटाळण्यात आली तर आरोपी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा पर्याय अवलंबतील. या आरोपींना धोका असल्याने त्यांना सुरवातीपासूनच स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले होते. दिल्ली न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना इतर कैद्यांसोबत ठेवण्यात येत आहे.