दादरचा टिळक पूल ढासळतोय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पालिका आणि रेल्वेकडून टिळक पुलाच्या डागडुजीचे काम करण्यात येते. पालिकेने दोन कोटींचा निधी मध्य रेल्वेला डागडुजी व देखभालीसाठी दिला आहे. पालिकेच्या हद्दीत येणारा भाग आम्ही दुरुस्त करतो. जिथे दुरवस्था झाली आहे तो भाग लवकरच दुरुस्त करण्यात येईल. 
- शीतला प्रसाद ओ. कोरी  (मुख्य अभियंता, पालिका पूल विभाग)

मुंबई - दादर पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा ब्रिटिशकालीन टिळक पूल अत्यंत जीर्ण झाला असून, त्याच्या भिंती आणि स्लॅबची ठिकठिकाणी दूरवस्था झाल्याने पुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांसह फेरीवाल्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुलावरील पदपथाची डागडुजी होत असली तरी पुलाच्या भिंतींकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

महाडमधील पूल पुरात वाहून गेल्यानंतर मुंबईतील जुन्या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला; परंतु अद्यापही जुन्या आणि मोडकळीस आलेल्या पुलांचा प्रश्‍न अनुत्तरितच आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादरला पूर्व आणि पश्‍चिमेशी जोडणाऱ्या टिळक पुलाची दूरवस्था झाली आहे. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मध्य आणि पश्‍चिम रेल्वेचे रूळ टिळक पुलाखालून जातात. शहरातील महत्त्वाचा पूल असतानाही त्याच्या दूरवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांच्या जीवाला धोका आहे.

दादर टीटीच्या दिशेला काही अंतरावर पूल खचला आहे. दुसरीकडे पुलाच्या बाजूला जाहिरात फलक उभारण्यासाठी भिंतीला भगदाड पाडण्यात आले आहेत. दादर पूर्वेला पुलाचे काही ठिकाणी प्लास्टर कोसळल्याने पुलाच्या गंजलेल्या व तुटलेल्या तारा स्पष्टपणे दिसत असल्याने पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे. स्थानिक नागरिकांनी पुलाच्या दूरवस्थेविषयी वारंवार तक्रारी केल्यानंतर महापालिकेने पुलाच्या भिंतीवर उगवलेली झाडे तोडली. काही ठिकाणी दगड बसवून मलमपट्टी केली. मात्र, मोडकळीस आलेल्या भागाकडेच महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती आहे.

पालिकेची मलमपट्टी
दादर (बातमीदार) : टिळक पुलाची पार दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणचे मोठे दगड निघाल्याने तो धोकादायक झाला आहे. पालिकेने मात्र काही ठिकाणी डागडुजी करून धन्यता मानली आहे. पालिकेची डागडुजी म्हणजे वरवरचा मुलामा असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. टिळक पुलावरून प्लाझा सिनेमाच्या बाजूने खाली भाजी मार्केटकडे उतरताना असलेल्या जिन्यांची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसाळ्यात पुलांवरून पाणी गळत असते. 

नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेने नुकतीच पुलाच्या जिन्याची डागडुजी केली; पण पुलाच्या अन्य ठिकाणच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

पेव्हर ब्लॉक लागले; पण...
दादर पश्‍चिमेकडील भाजी मार्केटजवळील पुलाच्या भिंतीचे दगड निखळले आहेत. ठिकठिकाणी भिंतीला तडे जाऊन पुलाचा भाग एका बाजूला झुकला असल्याने तो कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे मार्केटमधील फेरीवाले, वाहनचालक, पादचारी आदींचा जीव धोक्‍यात आला आहे. पुलाची अवस्था बिकट असतानाही महापालिकेने पुलाच्या पदपथाच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे. पेव्हर ब्लॉक लावून पूल चकाचक बनवला असला तरी त्याचा सांगाडा अधिकच कमकुवत झाला आहे. त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, असा आरोप दादरमधील मनसेचे नेते मयूर सारंग यांनी केला.

Web Title: Dadar, Lokmanya Tilak Bridge