परीक्षा दिली नाही, म्हणून मुलीने रचला अपहरणाचा बनाव 

परीक्षा दिली नाही, म्हणून मुलीने रचला अपहरणाचा बनाव 

मुंबई - बुरखा घातलेल्या चार महिलांनी अपहरण केले होते, असे मुलीने सांगितल्यानंतर तिच्या आईच्या पायाखालची वाळूच सरकली... तात्काळ त्यांनी स्थानिक पोलिस ठाणे गाठले... प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनीही आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली... सीसी टीव्ही, स्थानिक खबरे यांच्या साह्याने शोध सुरू केला, पण हाताला काहीच लागले नाही. त्यामुळे पोलिसही काही काळ चक्रावले. अखेर चौकशीत भलताच प्रकार पुढे आला. गणिताच्या परीक्षेला बसली नसल्यामुळे घाबरून या 11 वर्षीय मुलीने हा बनाव रचल्याचे तपासात पुढे आले. 

परळ येथील गजबजलेल्या नाक्‍यावरून चार महिलांनी जबरदस्तीने काळ्या रंगाच्या व्हॅनमध्ये बसवले. त्यानंतर खोदादाद सर्कलवरून व्हॅन प्लाझा सिनेमाजवळ त्या महिला घेऊन गेल्या. तिथे कशीतरी स्वतःची सुटका करून घेतली, असे या मुलीने पोलिसांना सांगितले. दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसही चक्रावले. अखेर गुन्हा दाखल करण्यापूर्वी घटनेची शहानिशा करण्याचे ठरवले. त्यानुसार तिला व तिच्या आईला गाडीत बसवून पोलिस घटनास्थळावर गेले. त्यानंतर मुलीने दिलेल्या माहितीनुसार गाडी नेत प्रत्येक ठिकाणची पाहणी करण्यात आली. मुलगी थोडी चाचपडून उत्तरे देत होती. अखेर दादरमध्ये ज्या ठिकाणी गाडीने वळण घेतले, असे तिने सांगितले. तो एक मार्गी रस्ता होता. त्यावेळी पोलिसांचा मुलीवर संशय येऊ लागला. अखेर पोलिसांनी घटनास्थळावरील काही ठिकाणच्या सीसी टीव्हीची तपासणी केली, पण काहीच आढळले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच बळावला. त्यामुळे महिला पोलिसाला मुलीसोबत बोलण्यास सांगितले. पण त्यावेळीही विश्‍वासात घेतल्यानंतरही ती मुलगी अपहरण झाल्याचेच सांगत होती. अखेर सीसी टीव्ही पाहणीत कुठेच काही सापडले नाही. असे या मुलीला सांगितल्यानंतर ती काहीशी घाबरली व तिने संपूर्ण प्रकार सांगायला सुरुवात केली. 

या मुलीला क्‍लासमधील काही मैत्रिणी त्रास द्यायच्या. त्यामुळे तिचे अभ्यासात लक्षच लागत नव्हते. त्यामुळे अभ्यास न झाल्यामुळे घाबरून ती गणिताच्या परीक्षेला बसलीच नाही. हे घरी कळाले तर आई ओरडेल. या भीतीने तिने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला, असे तपासात उघड झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com