घरे नियमित करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

आम्ही कळंबोलीतील रहिवाशी अनेक वर्षे पुराच्या भीतीखाली जगत आहोत. जोराचा पाऊस आला की आमच्या छातीत धडकी भरते. पुरापासून जीव वाचवण्यासाठीच घरांची उंची वाढवली; परंतु आतापर्यंत स्वतःच्याच घरात आम्ही अनधिकृत ठरत आहोत. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्‍नावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता हा प्रश्‍न लवकरच सुटेल याची खात्री वाटते.
- रामदास शेवाळे

पनवेल -बीडीडी चाळींचा विषय अनेक वर्षे रेंगाळला होता. सरकारने तातडीने निर्णय घेऊन तो मार्गी लावला आहे. त्याचप्रमाणे कळंबोलीत गरजेपोटी उंच केलेली घरेही लवकरच नियमित करावीत, अशी मागणी भाजपचे रामदास शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रत्यक्ष भेटून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, अरुण तरंगे व श्रीनिवास क्षीरसागर उपस्थित होते. रामदास शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्‍न मांडल्यामुळे येथील रहिवाशांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

कळंबोलीतील नागरिकांचा आधार अशी प्रतिमा असलेले रामदास शेवाळे यांनी शहरातील नागरिकांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित व्हावीत व परजिल्ह्यातील नागरिकांचा योग्य सन्मान राखला जावा या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या नेत्यांनीही त्यांना याबाबत आश्‍वासन दिल्यानंतरच त्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

कळंबोली वसाहत समुद्रसपाटीपासून ३.२५ मीटर खोल वसविली गेली आहे. त्यामुळे या वसाहतीला पुराचा कायमच धोका असतो. २००५ मध्ये आलेल्या महापुराने कळंबोली वसाहत पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. तेव्हा येथील रहिवाशांचे आर्थिक नुकसान झालेच; शिवाय या पुरामध्ये अनेक जण वाहून गेले होते.

आजही पावसाचा जोर वाढल्यास येथील तळमजल्यावर पाणी साचते. पुराचा धोका या वसाहतीला नेहमीच असल्याने भीतीपोटी येथील रहिवाशांनी आपल्या घरांची उंची वाढवली; परंतु सरकार दरबारी अनेक वर्षे याबाबत चर्चा सुरू असूनही पुराच्या भीतीने उंच केलेली घरे नियमित केली जात नव्हती. याबाबतचे सविस्तर निवेदन शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. 

मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर कळंबोलीत आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक वर्षे येथील रहिवाशी आपले हक्काचे घर अधिकृत होण्याची प्रतीक्षा करत आहेत. रामदास शेवाळे यांनी हा मुद्दा उचलून धरला व मुख्यमंत्र्यांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लालफितीत अडकलेला हा प्रश्‍न लवकरच मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.