डॉ. आंबेडकरांच्या विचारसूत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अर्थनिर्धारण : उबाळे

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबादेवी: एखाद्या संकल्पनेला असलेला प्रचलित अर्थ नाकारून तिची नवीन अर्थासह पुनर्मांडणी करण्याचे काम अर्थनिर्धारणाच्या कक्षेत येते, 'अर्थनिर्धारणशास्त्र ' (Heremeneutic ) ही स्वतंत्र विद्याशाखा म्हणून विकसित होत आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या समग्र विचारसूत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अर्थनिर्धारण दिसते. त्यांची अर्थनिर्धारणपद्धती आणि तिला असलेले तात्विक अधिष्ठान यावर संशोधनात्मक अभ्यास होणे आवश्यक आहे.

मुंबादेवी: एखाद्या संकल्पनेला असलेला प्रचलित अर्थ नाकारून तिची नवीन अर्थासह पुनर्मांडणी करण्याचे काम अर्थनिर्धारणाच्या कक्षेत येते, 'अर्थनिर्धारणशास्त्र ' (Heremeneutic ) ही स्वतंत्र विद्याशाखा म्हणून विकसित होत आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या समग्र विचारसूत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अर्थनिर्धारण दिसते. त्यांची अर्थनिर्धारणपद्धती आणि तिला असलेले तात्विक अधिष्ठान यावर संशोधनात्मक अभ्यास होणे आवश्यक आहे. आंबेडकरी चळवळीच्या मूलभूत प्रमेयांचे आकलन होण्यास या विषयावरील संशोधन निश्चितच सहाय्यकारी ठरेल, असे प्रतिपादन पालि साहित्याचे गाढे अभ्यासक देवेंद्र उबाळे यांनी मुंबईतील चेतना महाविद्यालयात केले. 

चेतना महाविद्यालयातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानात ' आंबेडकरी विचार सूत्रांतील अर्थनिर्धारणाची मीमांसा' या विषयावर  उबाळे बोलत होते. अध्यक्षस्थानी सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर होते. 

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आणि लेखनातील महत्त्वपूर्ण संदर्भांसह हा नाविन्यपूर्ण विषय समजावून देताना उबाळे पुढे म्हणाले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली मानवमुक्तीची चळवळ लोकाभिमुख करताना त्यांनी तिची सैद्धांतिक मांडणी केली. तिला वैचारिक पाठबळ दिले. तिची तार्किक आणि तात्विक पायावर उभारणी केली. त्यामुळेच आंबेडकरी चळवळ यशस्वी झाली आणि काळाच्या कसोटीवर टिकून राहिली. यामागे बाबासाहेबांचा तत्त्वचिंतनात्मक अभ्यास आणि संकल्पनांचा नवा अन्वयार्थ देऊन त्यांची पुनर्मांडणी करण्याची असामान्य पात्रता या बाबी अतिशय महत्त्वाच्या होत्या. 

चेतना महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ महेशचंद्र जोशी, प्रशासकीय अधिकारी डाॅ. एस. एस पाटील, उपप्राचार्य प्रा. गिरीश साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या स्मृती व्याख्यानाच्या पुस्तिकेचे प्रकाशन चेतना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीदत्त हळदणकर यांनी केले. चेतना शिक्षण संस्थेचे सचिव मा. शिरीष चौधरी यांनीही कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली. 

CLA -- RO  group या चेतना महाविद्यालयतील विद्यार्थी वाद्यवृंदाने सादर केलेल्या भीमगीतांच्या बहारदार गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. 

प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व निमंत्रित सामाजिक कार्यकर्ते यांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गजानन डोंगरे यांनी केले.

Web Title: Devendra Ubale speaks about Dr Babasaheb Ambedkar and his thoughts