ठाण्यात कोरडी धुळवड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

ठाणे - उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन ठाण्यात सर्वत्र कोरडी धुळवड खेळण्यात आली. गतवर्षीप्रमाणेच या वर्षीसुद्धा पालिकेने धुळवडीसाठी टॅंकरबंदी केली होती. त्याचबरोबर शहरातील समाजिक संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळे शहराच्या विविध भागात कोरडे रंग उधळण्यात आले.  

ठाणे - उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन ठाण्यात सर्वत्र कोरडी धुळवड खेळण्यात आली. गतवर्षीप्रमाणेच या वर्षीसुद्धा पालिकेने धुळवडीसाठी टॅंकरबंदी केली होती. त्याचबरोबर शहरातील समाजिक संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळे शहराच्या विविध भागात कोरडे रंग उधळण्यात आले.  

पोलिस यंत्रणा सतर्क राहिल्यामुळे; तसेच ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवल्यामुळे शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. अनेक सोसायटी परिसरात, मुख्य चौकामध्ये खेळलेल्या धुळवडीची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्याचा सपाटा तरुणाईकडून सुरू होता. ‘रेन डान्स’ बंद असले, तरी पिशव्या मारण्याचा प्रकार ठिकठिकाणी सुरू होता. काही ठिकाणी झोपडपट्टी आणि रस्त्यांच्या बाजूच्या इमारतींमधून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर प्लास्टिक पिशव्यांची आणि फुगेफेक झाली.

महाराष्ट्रात दोन वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याने यंदा ठाणे पालिकेने गतवर्षीप्रमाणे टॅंकरबंदी लागू केली. यंदा धरणांमध्ये पुरेसा साठा असला, तरी काटकसरीला सुरुवात झाली आहे. काही वर्षांपासून कोरडी होळी साजरी करण्याचे आवाहन सामाजिक संस्थांकडून केले जात आहे. यामुळेच होळीमध्येही त्याचे प्रतिबिंब जाणवू लागले असून सोमवारी नागरिकांनी कोरडी होळी खेळण्यास प्राधान्य दिले. कोरड्या रंगाची उधळण केल्यामुळे रंग घालवण्यासाठी पाण्याचा होणारा अतिरिक्त अपव्ययही टळला. घोडबंदर, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर, कळवा या भागांमधील अनेक सोसायट्यांमध्ये कोरडी होळी खेळण्यास प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून येत होते. काही सोसायट्यांनी आपल्या इमारतीच्या नोटीस बोर्डवरही ‘पाणी वाचवा’चे संदेश देऊन कोरडी होळी खेळण्यास प्राधान्य दिले होते; तर राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही कोरडी होळी खेळत ‘पाणी वाचवा’चा संदेश नागरिकांना दिला. 

समाजमाध्यमांवर कोरड्या होळीची क्रेझ 
धुळवडीमध्ये रंगाची उधळण झाल्यानंतर काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक असलेली महाविद्यालयीन तरुणाई, सोसायट्यांमधील नागरिक, सगळेच कोरड्या होळीला प्रोत्साहन देताना दिसून आले. पाण्याशिवाय खेळलेली होळी अधिक रंगीत आणि आकर्षक दिसत असल्यामुळे अनेकांनी कोरड्या होळीला प्रोत्साहन दिले. सामाजिक संदेश देऊन साजरी केलेली होळी अनेकांनी समाजमाध्यमांवरून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. 

फुगेफेक 
एका बाजूला सामाजिक संदेश देत कोरडी होळी साजरी करण्याचा प्रयत्न होत असतानाच, रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर प्लास्टिकच्या पिशव्यांमधून आणि फुगेफेक सर्रास सुरू होती. काही ठिकाणी फुग्यांपेक्षा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये रंगीत पाणी, घाण पाणी आणि अंडी फेकून मारण्याचा किळसवाणा प्रकारही घडल्याचे दिसून आले. मात्र पोलिस ठाण्यांपर्यंत कोणतीही तक्रार आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वागळे इस्टेट, किसननगर, कळवा झोपडपट्टीच्या भागांमध्ये असे प्रकार सर्रास सुरू होते.

Web Title: Dhulivandan celebration without water