आराखडा, जीएसटीबाबत भाजपला शिवसेना घेरणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

ठाकरेंची नगरसेवक, आमदारांसोबत बैठक

ठाकरेंची नगरसेवक, आमदारांसोबत बैठक
मुंबई - मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा आणि वस्तू सेवा करावरून भाजपला घेरण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. त्यासाठी गुरुवारी "शिवसेना भवन'मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडक नगरसेवक आणि आमदारांची बैठक घेतली. आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडचे प्रस्तावित आरक्षण रद्द करण्याबरोबरच अन्य पाच ते सहा उपसूचना विकास आराखड्यावर शिवसेना महासभेत मांडणार आहे. त्यासाठी सर्व नगरसेवक व आमदारांची पुढील आठवड्यात विकास आराखड्यावर आणि त्यानंतर आमदारांची "जीएसटी'बाबत (वस्तू सेवा कर) बैठक होणार आहे.

पालिकेचा 2014 ते 2034 या 20 वर्षांचा विकास आराखडा महासभेत सादर करण्यात आला आहे. त्यात गोरेगाव येथील आरे वसाहतीत मेट्रोच्या कारशेडसाठी आरक्षण प्रस्तावित आहे. या आरक्षणाला शिवसेनेसह कॉंग्रेसनेही विरोध केला आहे. महासभेत उपसूचना मांडून हे आरक्षण रद्द करण्याचा ठराव करावा लागणार आहे. या आराखड्यातील मेट्रो कारशेड, तसेच इतर शिफारशींबाबत उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. या वेळी कारशेडचे आरक्षण रद्द करण्याबरोबरच पाच ते सहा उपसूचना मांडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आराखड्याबाबत आमदार आणि नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी वांद्रे येथील "रंगशारदा' सभागृहात शिवसेना बैठक घेणार आहे.

आराखड्याबरोबरच जीएसटीमुळे मुंबई महापालिकेला किमान सात हजार कोटींच्या जकातीवर पाणी सोडावे लागणार आहे. जीएसटीच्या बदल्यात सरकारकडून अवघ्या पाच वर्षांचे अनुदान मिळणार असल्याने त्यानंतर करवाढीखेरीज पर्याय राहणार नाही. त्यावरून भाजपची शिवसेना कोंडी करण्याची शक्‍यता आहे. यासाठीही सर्व आमदारांची पुढील आठवड्यात "मातोश्री'वर बैठक बोलावण्यात आली आहे.

Web Title: diagram gst Surrounded shivsena by bjp