राज्याच्या राजकारणावर आठ दिवसांनी बोलूया

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

मुंबई - महानगरपालिकेच्या निवडणुकीत सरकार नोटीस पीरियडवर असल्याचा इशारा देणाऱ्या शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या निकालानंतर नवी खेळी सुरू केली आहे. भाजपने एकहाती उत्तर प्रदेश काबीज केल्यामुळे आता "रामाचा वनवास संपेल...' अशा शब्दांत अपेक्षा व्यक्त करताना राज्याच्या राजकारणावर आठ दिवसानंतर बोलूया, असा सूचक इशारा शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या आज जाहीर झालेल्या निकालावर बोलताना उत्तर प्रदेशच्या विजयाबद्दल भाजपचे कौतुक केले. त्याचबरोबर हिंदुत्ववादी सरकार आल्याने आता तरी रामाचा वनवास संपेल, असा चिमटा त्यांनी भाजपला काढला. सर्व राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेला जो चांगला पर्याय दिसला तो निवडण्यात आला. असा या निकालाचा अर्थ सांगताना उत्तर प्रदेशातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती या निकालाचे कारण असावे, असेही त्यांनी नमूद केले; मात्र राज्यात आणि मुंबईत शिवसेनेने भाजपची घोडदौड रोखली असल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशच्या निकालाचे राज्याच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. त्याबाबत राऊत यांनी सांगितले की, राज्याच्या राजकारणावर उत्तर प्रदेशच्या निकालाचा काही परिणाम होणार नाही. राज्याच्या राजकारणावर आठ दिवसांनी बोलू, असे सूचक विधान त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना हिवाळी अधिवेशनात आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून शिवसेना राज्यातही वातावरण तापवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा न झाल्यास शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: discussion on state politics after 8 days