दिव्याच्या थांब्यावरून श्रेयवाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

डोंबिवली  - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकणात जाणाऱ्या दादर-सावंतवाडी गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. या थांब्याच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. 

डोंबिवली  - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकणात जाणाऱ्या दादर-सावंतवाडी गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे. या थांब्याच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. 

शिवसेनेचे पदाधिकारी दिवा थांब्याचे श्रेय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे असल्याचे सांगत त्यांचे आभार मानत आहेत; तर दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजप आमदार संजय केळकर यांच्यामुळेच दिव्याला थांबा मिळाल्याचे सांगत त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. दिवा तसेच कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरात कोकणवासीयांची संख्या अधिक आहे. गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी होण्यासाठी दिवा येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी होती. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने दादर-सावंतवाडी या कोकणात जाणाऱ्या गाडीला दिवा येथे थांबा दिला आहे. या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चढाओढ सुरू झाली आहे. गेल्या वर्षीही कोकणात जाणारी गाडी गणेशोत्सव काळात दिवा येथे थांबताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुरेश प्रभू, आमदार केळकर यांचे फलक फलाटावर झळकवला होता, तर शिवसेनेचे पदाधिकारीही भगवे झेंडे घेऊन रेल्वेस्थानकात दाखल झाले होते. 

खासदार श्रीकांत शिंदे यांनी दादर-सावंतवाडी या गाडीला यंदाही थांबा मिळावा म्हणून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे यंदाही या गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आला आहे.
- अमर पाटील, शिवसेना नगरसेवक, दिवा 

गेल्या वर्षीही या गाडीला दिवा येथे थांबा देण्यात आला होता. आमदार केळकर यांनी पदाधिकाऱ्यांसह रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती. शिवसेनेने उगाच श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. 
- आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना तथा भाजप पदाधिकारी
 

वेळापत्रक 
 दादर-सावंतवाडी (०१११३) 
१८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत 
प्रत्येक रविवार, मंगळवार, शुक्रवार
सकाळी ७.५० मिनिटांनी दादरहून सुटणार 
सकाळी ८.३५ मिनिटांनी दिव्याला थांबणार
 दादर-सावंतवाडी (०१११४)
१९ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरपर्यंत 
प्रत्येक सोमवार, बुधवार, शनिवार 
पहाटे ४.५० मिनिटांनी सावंतवाडीहून सुटणार 
दुपारी ३.०० वाजता दिव्याला थांबणार