वसई किल्ल्यावर मद्यपींचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

विरार - मद्यपी, गर्दुल्ले, प्रेमी युगुले यांचा वावर आणि चित्रपट, लघुपटांचे चित्रीकरण यामुळे पर्यटक आणि गिरिप्रेमींची कुचंबणा होत आहे. किल्ल्याच्या इतिहासाला गालबोट लागत असले, तरी प्रशासनाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. परिणामी वसई किल्ल्यात अभ्यास आणि संशोधनासाठी येणाऱ्या दुर्गमित्रांची संख्या कमी होत आहे.

विरार - मद्यपी, गर्दुल्ले, प्रेमी युगुले यांचा वावर आणि चित्रपट, लघुपटांचे चित्रीकरण यामुळे पर्यटक आणि गिरिप्रेमींची कुचंबणा होत आहे. किल्ल्याच्या इतिहासाला गालबोट लागत असले, तरी प्रशासनाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. परिणामी वसई किल्ल्यात अभ्यास आणि संशोधनासाठी येणाऱ्या दुर्गमित्रांची संख्या कमी होत आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या वसई किल्ल्यात दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी रिक्षा; तसेच खासगी वाहनांतून तरुणांची टोळकी दारूच्या बाटल्या घेऊन येतात. या दारूबाजांचा आरडाओरडा, गाणीबजावणी हे नेहमीचे दृश्‍य झाले आहे. त्यात भर म्हणून झाडाझुडपांच्या आडोशाला प्रेमी युगुलांचे चाळे सुरू असतात. गर्दुल्ल्यांचाही बिनबोभाट वावर सुरू असतो. दारूच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिक पिशव्यांचा कचरा यामुळे किल्ल्याच्या परिसराला अवकळा आली आहे.
छायाचित्रणाच्या नावाखाली येणारी मंडळी आणि प्रेमी युगुले किल्ल्याच्या अवशेषांवर "रंगकाम' करून इतिहासावर घाला घालत आहेत. गर्दुल्ल्यांनी आगी लावल्याच्या घटना तर जवळपास रोजच घडतात. गोन्सालो गार्सिया ख्रिस्तमंदिराचे आवार आणि मैदानात मद्यपींच्या पार्ट्या रंगतात. किल्ल्याच्या रक्षणासाठी काही महिन्यांपूर्वी नेमलेले पहारेकरी हतबल झाले आहेत. या प्रकारांना आळा घालण्याबाबत सरकार, स्थानिक प्रशासन उदासीनच दिसते, असा आरोप किल्ले वसई मोहिमेच्या डॉ. श्रीदत्त राऊत यांनी केला.

पावित्र्य राखण्याचा पुकारा
वसई किल्ल्यातील पोर्तुगीजकालीन न्यायालय, नगरपालिका, चक्री जिना, सेंट गोन्सालो गार्सिया चर्च, मुख्य ध्वजस्तंभ या ठिकाणी दारूबाजांचा धिंगाणा आणि प्रेमी युगुलांचे चाळे सुरू असतात. प्रशासनाने योग्य पावले न उचलल्यास हे प्रकार आणखी वाढतील, असे डॉ. श्रीदत्त राऊत म्हणाले. छायाचित्रणासाठी पुरातत्त्व विभागाची परवानगी बंधनकारक असून तसे फलक जागोजागी लावावेत, सुरक्षारक्षकांना ओळखपत्र द्यावे, पोलिसांनी कठोर उपाययोजना करून किल्ल्याचे पावित्र्य राखण्यास मदत करावी, अशा मागण्या किल्ले वसई मोहिमेने केल्या आहेत.

 

Web Title: Drinkers attack on Vasai Fort