पालिकेच्या मृत भिंती झाल्या सजीव 

दीपक शेलार
शनिवार, 14 एप्रिल 2018

ठाणे - ठाणे महापालिकेतर्फे दर वर्षी वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन मोहीम राबवली जाते. तसेच हरित जनपथ आणि हरित सायकल प्रकल्प राबवून पालिका क्षेत्रातील हरित क्षेत्र वाढवण्यासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने काही वर्षांपासून विविध उपक्रम हाती घेतले. त्याचाच भाग म्हणून शहरातील उड्डाणपुलांपाठोपाठ आता ठाणे महापालिका मुख्यालयाच्या बाह्य भिंतीवर हरित भिंत (ग्रीन वॉल) संकल्पना राबवण्यात आली आहे. यात भिंतींवर छोटी रोपटी लावून हा संपूर्ण परिसर हरित करण्यात आला आहे. या हरित क्रांतीमुळे पालिकेची इमारतही आता पर्यावरणस्नेही बनली आहे. 

ठाणे शहर स्मार्ट बनत असताना ठाणे महापालिकेने आता पर्यावरणस्नेही उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गालगत हरित जनपथ, तर नुकतेच हरित सायकल प्रकल्प राबवून पालिकेने पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामुळे ठाणेकरांना निसर्गभ्रमंतीची अनुभूती मिळत असताना शहरामध्ये अडीच लाख वृक्ष लागवडीचा कार्यक्रमही राबवण्यात आला. शहरातील हरित क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशातून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यानंतर हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हरित भिंतींची संकल्पना पुढे आणली होती. ही संकल्पना कापूरबावडी आणि माजीवाडा येथील उड्डाणपुलाखालील खांबांवर राबवण्यात आली. 

या खांबांवर उभ्या रेषेत छोट्या कुंड्या लावून त्यामध्ये फुलझाडे लावण्यात आली. त्याच धर्तीवर पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका मुख्यालयाच्या भिंतीवर हरित भिंत तयार करण्यात आली आहे. या हरित भिंतीमुळे महापालिकेच्या प्रवेशद्वाराचा संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. किंबहुना मृतवत वाटणाऱ्या या भिंती सजीव बनल्याने संपूर्ण इमारत पर्यावरणस्नेही बनली आहे. 

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे ही पर्यावरणस्नेही संकल्पना राबवण्यात आली आहे. यासाठी मे. गिरीकृपा ऍग्रोटेक या संस्थेतर्फे ग्रीन वॉल उभारल्या जात आहेत. यासाठी साधारण आठ ते नऊ लाख रुपये खर्च झाला आहे. ठिबक सिंचनद्वारे ग्रीन वॉलवरील रोपट्यांना नियमित पाणी शिंपले जाते. त्यामुळे महापालिकेत येणाऱ्या नागरिकांचे स्वागत हरित भिंतीद्वारे होत आहे. 
- सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

Web Title: Eco-Friendly Green Wall