एन्काउंटर स्पेशालिस्ट आरोपीच्या पिंजऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

नालासोपारा - माहितीच्या अधिकारात माहिती मागवून बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागणाऱ्या नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल यादव याच्या प्रकरणात, पोलिसांचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनाही आरोपी करण्यात आले आहे. डॉ. यादव याला मोबाईल जाळून टाकण्याचा सल्ला वाझे यांनी दिला. त्यानंतर यादवने मोबाईल जाळला.

या प्रकरणाचे तपासाधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक प्रशांत लांगी यांनी काल वसई न्यायालयापुढे ही माहिती दिली. दरम्यान, वाझे यांच्याबरोबर आणखी काही हायप्रोफाईल व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

बिल्डरांना गैरप्रकार उघड करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी डॉ. अनिल यादव याच्याविरोधात वसई, माणिकपूर आणि वालीव पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर डॉ. अनिल यादव फरारी झाला होता. त्या वेळी सचिन वाझे यांनी मोबाईल नष्ट करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार गुजरातमधील वापी येथे डॉ. यादव व वाझे यांची बैठक झाली होती. यादवला घेण्यासाठी वाझे यांनी खास गाडी पाठवली होती. यादव हा आरोपी असल्याचे माहिती असूनही, त्याला मदत केल्याचा आरोप वाझे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

आणखी बडे मासे?
वसई- विरारसह मुंबईतील अनेक राजकारणी, शासकीय- निमशासकीय अधिकाऱ्यांचा या हाय प्रोफाईल रॅकेटमध्ये समावेश असल्याचे तपासात उघड होत आहे. या पार्श्‍वभूमीवर तपास यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर दबाव टाकला जात आहे. या प्रकरणात कोकण परिक्षेत्राचे तत्कालीन पोलिस महानिरीक्षक प्रशांत बुरुडे यांनी तपासाधिकारी प्रशांत लांगी यांची तडकाफडकी बदली करून त्यांना पालघर कंट्रोल रूममध्ये हजर राहण्याचा आदेश दिला होता; मात्र पाच दिवसांनंतर पुन्हा बदली रद्द करण्यात आली होती. या सर्व प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागणार असल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.