इंजिनियरिंग ते व्यावसायिक व्हाया लावणी

इंजिनियरिंग ते व्यावसायिक व्हाया लावणी

मुंबई - इंजिनीयर झाल्यावर स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी करून आयुष्य सुखात घालवण्याकडे तरुणांचा कल असतो. बालाजी चिखले हे मात्र याला अपवाद ठरले. बायोमेडिकल इंजिनियरिंग केल्यानंतर नोकरी करत वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी व्यवसायिक म्हणून नाव कमावल्यानंतरही लावणीवरील प्रेमातून बालाजी यांनी महिलांच्या वेशात लावणी सादर करण्यास सुरुवात केली. त्यातही त्यांनी यश मिळवले. आजघडीला बालाजी चिखले मुंबईत लावणीचे अनेक कार्यक्रम गाजवत आहेत.

बालाजी यांना लहानपणापासून लोकनृत्याची आवड. नृत्याची उत्तम पकड, चेहऱ्यावरील हावभाव यामुळे अनेकदा शिक्षकांनीही त्यांना लावणी सादर करण्याच्या सूचना दिल्या. मुलाने स्त्रीवेश करून नृत्य करणे म्हणजे कमीपणाचे मानले जात होते. पोटापाण्याचा वेगळा उद्योग नाही म्हणून असे नृत्य करत असल्याचा लोकांचा समज होता. त्यातच बालाजी यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने काम करत शिक्षण पूर्ण केले.

बायोमेडिकल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर नोकरीसाठी कर्नाटकहून थेट मुंबई गाठली. पोटापाण्यासाठी मिळेल ती नोकरी करत वैद्यकीय क्षेत्रात व्यवसायाची वाट धरली. व्यवसायाची घडी नीट बसवल्यानंतर बालाजी यांनी स्त्रीवेशातील लावणी सादर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लोकांनी नावे ठेवली. नसते उद्योग कशाला, बायकी नाच कशाला, असे टोमणे मारले. पण, बालाजी यांनी लावणीवरील प्रेम कमी होऊ दिले नाही. कालांतराने टीकाकारांची तोंडेही बंद झाली. मला लहानपणापासून लावणी आवडते. माझी आवड मी जोपासली. त्यामध्ये कधीही माझे शिक्षण, व्यवसाय आला नाही. पत्नी, दोन मुलांसह आज सुखी संसार असल्याचे बालाजी यांनी सांगितले.

पुरुष कलावंतांनी स्त्रीवेश परिधान करून केलेल्या नृत्याबद्दल समाजामध्ये आजही साशंकता आहे. अन्य नृत्य प्रकारांप्रमाणे मानसन्मान या प्रकाराला मिळत नाही. बालाजी यांनी हा सन्मान खेचून आणला. मुंबईत पुरुष कलावंतांच्या लावणी ग्रुप्सनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पूर्वी काहींच्या संख्येने असलेल्या कलाकारांच्या संख्येत आता वाढ झाली. अजूनही या क्षेत्रात उच्च विद्याविभूषित लोकांनी यायला हवे, तरच लोकांच्या मनातील शंका संपुष्टात येतील आणि ही कला एका वेगळ्या पातळीवर पोहोचेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com