ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी शिवसेना आंदोलन करणार

सुचिता करमरकर
बुधवार, 19 जुलै 2017

​राज्य शासनाने या किल्ल्यासाठी एक कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु या कामाची सुरुवात होणार कधी हा प्रश्न आहे. मागील आठवड्यात झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातील आदेश दिले आह, मात्र त्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे. 
-राजेंद्र देवळेकर, महापौर

कल्याण- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या आरमाराच्या स्थापनेचा साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सरकारने याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना कल्याण शहर संघटक रविंद्र कपोते यांनी दिला. 

आठ दिवसापूर्वी किल्ल्याच्या मागील भागातील बुरुजाचा भाग कोसळला होता. आज किल्ल्यावरील देवीच्या मंदिरासभोवतालच्या पारावर झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडे वारंवार विनंती करुनही याकडे लक्ष दिले जात नसेल तर आपण पुढील सोमवारी याठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचे कपोते यांनी स्पष्ट केले. कल्याणचा ऐतिहासिक वारसा दर्शवणारी ही वास्तू आहे, राज्य सरकार आणि पुरातत्व खात्याने आत्तापर्यंत या किल्ल्याची डागडूजी केली नसल्याने याची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात येथील बुरुजांची पडझड होत आहे. ही दुरुस्ती सोमवारपर्यंत सुरु न झाल्यास आपण उपोषण करु असे कपोते यांनी स्पष्ट केले. कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह कपोते यांनी आज किल्ल्याची पाहणी केली. 

पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या यावर्षीच्या अर्थ संकल्पात किल्ल्याच्या डागडुजीसाठी एक कोटी 79 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आहे. यातील 25 लाखांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.