युरोपियन यंत्रणेला लाल सिग्नल?

European signal red signal
European signal red signal

मुंबई - यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे. रेल्वेतील प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून देशभरात १२ हजार किलोमीटर रेल्वे रुळांवर युरोपियन सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार होती; मात्र मोठ्या प्रमाणात खर्च का करावा, असा सवाल उपस्थित करत युरोपियन रेल्वेच्या धर्तीवर देशभरातील सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्याचा ७२ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने धुडकावून लावला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

युरोपियन ट्रेन कंट्रोल यंत्रणा मुंबईसह कोलकाता, दिल्ली आणि चेन्नईतील रेल्वेतील रुळांवर लावण्याची योजना आहे. त्यासाठी जागतिक स्तरावर निविदा मागवण्यात आल्या; परंतु पंतप्रधान कार्यालयाने त्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याने त्याबाबतचा प्रस्ताव बारगळणार आहे. युरोपियन सिग्नल यंत्रणेमुळे सुरक्षित रेल्वे प्रवास व गाड्यांच्या संख्येत ४० ते ५० टक्‍क्‍यांनी वाढ करणे शक्‍य आहे. युरोपमधील रेल्वे यंत्रणेवर वापरली जाणारी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्‍शन प्रणाली भारतात आणली जाणार होती. त्यामुळे लोको पायलट आणि मोटरमनचे काम सोपे होणार होते. संपूर्ण देशभरातील रेल्वेच्या १२ हजार किलोमीटर जाळ्यावरील सिग्नल यंत्रणा बदलण्यात येणार होती. त्यात रुळावर सेन्सर्स बसवणे अपेक्षित होते; मात्र संपूर्ण युरोपमध्ये अशी प्रणाली कार्यान्वित नसल्याने ती देशभरात वापरणे धोक्‍याची घंटा ठरू शकते. 

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने संपूर्ण सिग्नल प्रणाली अद्ययावत करण्याचा प्रस्ताव फेटाळल्याने रेल्वे बोर्ड एखाद्या लहान भागात त्याची चाचणी घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  

काय आहे ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्‍शन यंत्रणा...
ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्‍शन (एटीपी) यंत्रणा म्हणजे सध्याच्या रेल्वेमार्गांवरील खांबांवर असलेल्या सिग्नल यंत्रणेऐवजी गाडीतच बसवलेली सिग्नल यंत्रणा होय. ही सिग्नल यंत्रणा डिजिटल असेल. यात मोटरमनला बसल्या जागी वेगासंबंधात नियंत्रण कक्षाकडून सिग्नलद्वारे झटपट सूचना मिळतील. तसेच पुढे धावत असणाऱ्या लोकल गाड्यांसंदर्भातही सिग्नल मिळेल. यामुळे लोकल वेळेत धावतील. तसेच लोकल फेऱ्यांची संख्याही वाढण्यास मदत मिळेल. प्रकल्पामुळे रेल्वे आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढेल. यामुळे रेल्वे गाड्या अधिक वेगाने धावू शकतील. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल. याशिवाय स्वयंचलित रेल्वे सुरक्षेमुळे एकाच रेल्वे रुळावरून अधिकाधिक गाड्या कमीत कमी वेळेत धावू शकतील.  

तांत्रिक अडचणी काय?
युरोपियन पद्धतीची सिग्नलिंग यंत्रणा सुरू करण्यासाठी गाड्यांच्या प्रकारांमध्ये साम्य असावे लागते. सध्या भारतीय रेल्वेवर मालगाड्या, लांब पल्ल्याच्या गाड्या, सर्वसाधारण तसेच राजधानी-शताब्दी आदी बनावटींच्या गाड्या व काही शहरांमध्ये लोकल गाड्या एकाच मार्गावर धावतात. त्याचप्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या इंजिनमध्येही विविध प्रकार आहेत. एकट्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीमध्ये बंबार्डिअर यंत्रणा असलेल्या नव्या गाड्या, सिमेन्स यंत्रणा असलेल्या लोकल, रेट्रोफिटेड गाड्या आदी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. त्याचबरोबर सिग्नल यंत्रणेतील वायरच्या तुकड्यांच्या चोऱ्या होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. देशभरात होणाऱ्या सिग्नल यंत्रणेच्या बिघाडांच्या घटनांमध्ये वायरची चोरी झाल्यामुळे होणाऱ्या बिघाडांचे प्रमाण ३० ते ४० टक्के एवढे जास्त आहे. आजूबाजूच्या वस्त्यांमधील रहिवाशांबरोबरच कोणीही रुळांवर येऊ शकत असल्याने ही समस्या भेडसावते. नव्या प्रस्तावित प्रणालीला रूळ ओलांडणाऱ्या माणसांबरोबरच प्राण्यांचाही धोका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com