पाच हजार कर्मचारी  दोन वर्षांत निवृत्त 

विष्णू सोनवणे
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई - बेस्टमधील पाच हजार कर्मचारी दोन वर्षांत सेवानिवृत्त झाले; तरीही बेस्टची आर्थिक स्थिती ढासळतच चालली आहे. चार वर्षांपासून भरती बंद असल्याने आगारांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बेस्ट चालवायची कशी, असा पेच उपक्रमापुढे निर्माण झाला आहे. ही बेस्टची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल आहे, अशी चर्चा सुरू आहे. 

मुंबई - बेस्टमधील पाच हजार कर्मचारी दोन वर्षांत सेवानिवृत्त झाले; तरीही बेस्टची आर्थिक स्थिती ढासळतच चालली आहे. चार वर्षांपासून भरती बंद असल्याने आगारांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बेस्ट चालवायची कशी, असा पेच उपक्रमापुढे निर्माण झाला आहे. ही बेस्टची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल आहे, अशी चर्चा सुरू आहे. 

बेस्टचा कणा मानल्या जाणारे 651 चालक आणि 657 वाहक निवृत्त झाले आहेत. त्यामुळे बेस्ट चालवणार कोण, अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. पर्यवेक्षक, जमादार, स्टार्टर, क्‍लिनर, मॅकेनिक, निरीक्षक, उपअभियंता, पर्यवेक्षक असे विविध खात्यांतील 5400 कर्मचारी-अधिकारी निवृत्त झाले आहेत. बेस्ट उपक्रमात हजारो पदे रिक्त आहेत. चार वर्षांपासून भरती पूर्णपणे बंद आहे. उपक्रम आर्थिक संकटात असल्यामुळे ही पदे भरण्यात आली नाहीत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

काही आगारांमध्ये तिकीट आणि वित्त विभागात पैशांची मोजणी शिपायांना करावी लागत आहे. एक पर्यवेक्षक दोन ते तीन आगारे सांभाळत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येऊ लागल्या आहेत. हा बेस्टवरील संकट वाढवून खासगीकरण करण्याचा कुटील डाव आहे, असा आरोप कामगार उघडपणे करू लागले आहेत. 

10 वर्षांपूर्वीचे कर्मचारी - 47 हजार 
सध्याचे कर्मचारी - 40 हजार 
वाहक - 11 हजार (चार वर्षांत अडीच हजार निवृत्त) 
चालक - 10 हजार (चार वर्षांत एक हजार निवृृत्त) 
बेस्टच्या बस - 3 हजार 337 (तीन वर्षांत 500 गाड्या ब्रेकडाऊन) 
प्रवासी संख्या - 28 लाख (10 वर्षांपूर्वी 40 लाख प्रवासी) 

बेस्ट सध्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे पदोन्नती देण्यात अडचणी येत आहेत. कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यास आर्थिक परिणामही विचारात घ्यावे लागतील. 
- सुरेंद्रकुमार बागडे,  महाव्यवस्थापक, बेस्ट 

रिक्त पदे भरत नसल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. त्यांच्या आरोग्यावर यामुळे परिणाम होत आहे. पर्यायाने बेस्टचे उत्पन्न कमी होत आहे. 
- सुहास सामंत, शिवसेना 

रिक्त पदांवर प्रशासन मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा खटाटोप करते; मात्र बेस्टला भरभरून उत्पन्न देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता असणाऱ्या ठिकाणी संबंधित पदे भरण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. ही खासगीकरणाकडे वाटचाल आहे. 
- सुनील गणाचार्य, भाजप 

Web Title: Five thousand employees retired in two years