ठाण्यात आले नवे पाहुणे

- श्रीकांत सावंत
मंगळवार, 17 जानेवारी 2017

गणनेत १३१ प्रजातींच्या चार हजार ८२ पक्ष्यांची नोंद 
ठाण्यातील आठ ठिकाणांहून १३१ प्रजातींच्या चार हजार ८२ पक्ष्यांचे दर्शन रविवारच्या पक्षिगणनेमध्ये पक्षिप्रेमींनी घेतले...

गणनेत १३१ प्रजातींच्या चार हजार ८२ पक्ष्यांची नोंद 
ठाण्यातील आठ ठिकाणांहून १३१ प्रजातींच्या चार हजार ८२ पक्ष्यांचे दर्शन रविवारच्या पक्षिगणनेमध्ये पक्षिप्रेमींनी घेतले...

ठाणे - ठाणे शहरातील हरितपट्ट्यात आढळणाऱ्या पक्षी प्रजातींच्या संख्येत वाढ झाली असून रविवारी झालेल्या पक्षिगणनेमध्ये पाच नव्या पक्षी प्रजातींची नोंद पक्षिप्रेमींनी केली. ब्लॅक नेप्ड ओरिओल, ग्रेटर स्टॅण्ड प्लोव्हर, रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर, तैगा फ्लायकॅचर, स्टेप गल अशा पाच नव्या प्रजातींची भर ठाण्यातील पक्षिविश्वामध्ये पडली आहे. त्यामुळे ठाण्यात आढळणाऱ्या पक्षी प्रजातींची संख्या २११ वरून २१७ पर्यंत पोहोचली आहे. रविवारच्या पक्षिगणनेमध्ये ठाण्यातील आठ ठिकाणांहून १३१ प्रजातींच्या चार हजार ८२ पक्ष्यांचे दर्शन ठाण्यातील पक्षिप्रेमींनी घेतले. 

रविवार हा सुट्टीचा दिवस असला तरी १५ तारखेच्या रविवारची सकाळ ठाण्यातील पक्षिनिरीक्षकांसाठी काहीशी वेगळी होती. शहरातील पक्ष्यांचा शास्त्रोक्त अभ्यास व्हावा या उद्देशाने पक्षिनिरीक्षकांनी सुरू केलेल्या अभियानांतर्गत रविवारी ठाण्यात अकरावी ठाणे पक्षिगणना  झाली. ‘होप’ व पर्यावरण दक्षता मंडळाच्या माध्यमातून २०१३ पासून हा उपक्रम सुरू आहे.

या माध्यमातून शहरातील आठ वेगवेगळ्या भागांमध्ये ५१ पक्षिनिरीक्षकांनी सहभाग घेऊन पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. ठाणे पूर्वेतील खाडीकिनारा, कोलशेत रस्ता, मुंब्रा टेकडी, मनोरुग्णालयाचा भाग, बाळकुम खाडी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मानपाडा परिसर, येऊरचे जंगल आणि पडले खिडकाळी या भागामध्ये एकाच वेळी पक्षिनिरीक्षण करण्यात आले. यामध्ये सात आणि चार वर्षांच्या दोन लहान मुलींनीही सहभाग नोंदवला होता. दर तीन महिन्यांतून होणाऱ्या या गणनेच्या नोंदीचा उपयोग महानगरपालिका, वन विभाग, वन्यप्रेमी; तसेच संशोधकांसाठी होत असतो. त्यासाठी पक्षिप्रेमी ही माहिती नोंदवून त्याचे जतन करतात. पक्ष्यांचा स्थलांतराचा हा काळ असल्यामुळे या वेळी पक्ष्यांची संख्या कमालीची वाढली होती. १३१ प्रजातीच्या चार हजार ८२ पक्ष्यांची नोंद अभ्यासकांनी घेतली. प्रतीक कुलकर्णी आणि अविनाश भगत या पक्षितज्ज्ञांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ठाणे खाडीकिनाऱ्यावर स्थलांतरित पक्ष्यांचे जणु संमेलन भरले होते.

सव्वाशे फ्लेमिंगोंचे दर्शन या वेळी पक्षिप्रेमींना झाले. ११० पाणकावळ्यांचा थवाही लक्ष वेधणारा होता, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक रवींद्र साठ्ये यांनी दिली.  

ब्लॅक नेप्ड ओरिओल (काळ्या मानेचा हळद्या), ग्रेटर स्टॅण्ड प्लोव्हर (मोठा चिखल्या), रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर (लाल छातीचा माशीमार), तैगा फ्लायकॅचर (लाल कंठांची माशीमार), स्टेप गल (गुलाबी पायाचा कुरव), या आत्तापर्यंत ठाण्यात कधीच नोंद झाली नसलेल्या पक्ष्यांची नोंद पक्षिप्रेमींनी या वेळी केली. देश-परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांबरोबरच हिमालयातले पक्षी या पक्षिगणनेचे मुख्य वैशिष्टय होते.
- अविनाश भगत, पक्षीअभ्यासक.

Web Title: flemingo in thane