माजी मंत्री जयवंतीबेन महेता यांचे निधन

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

1962 पासून राजकरणात सक्रीय असणाऱ्या जयवंतीबेन मेहता यांनी नगरसेविकेपेसून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात त्यांनी ऊर्जामंत्रीपद भुषविले होते.

मुंबई - माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेत्या जयवंतीबेन महेता (वय 78) यांचे आज निधन झाले. गेले सहा महिने त्या यकृताच्या विकाराने आजारी होत्या. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्या सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाल्या होत्या. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या जयवंतीबेन जनसंघापासून बिनीच्या कार्यकर्त्या होत्या. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय विद्युत राज्यमंत्री म्हणून लक्षणीय कामगिरी नोंदवली होती. जयवंतीबेन यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कॉंग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष संजय निरूपम, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, राज्यसभा सदस्य आणि शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार या वेळी उपस्थित होते. जयवंतीबेन यांच्या निधनाने ज्येष्ठ नेत्या काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्‍त केली आहे.

अल्पपरिचय
जयवंतीबेन या गुजराती मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला. औरंगाबाद येथे त्यांचा जन्म झाला. विवाहानंतर त्या मुंबईत आल्या. सर्वसाधारण कुटुंबातील महिला ज्या काळात राजकारणात येण्याचाही विचार करत नसत व घरात कोणतेही राजकीय वातावरण नसताना त्या महागाईच्या विरोधातील निदर्शनांमुळे जनसामान्यांचे प्रश्‍न हाती घेऊन त्या सार्वजनिक जीवनात उतरल्या. सध्या उत्तर प्रदेशचे राज्यपाल असणारे राम नाईक, (कै.) वेदप्रकाश गोयल असे नेते हाती कोणतीही साधनसामग्री नसताना जनसंघाची उभारणी करण्यासाठी मुंबईत सक्रिय झाले तेव्हा जयवंतीबेन त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात उतरल्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. दहा वर्षे मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून दमदार कामगिरी बजावल्यावर त्या विधानसभेवर निवडून गेल्या. दोन वेळा त्या भाजपच्या माध्यमातून आमदार म्हणून विधिमंडळात निवडून गेल्या. या आमदारकीचा प्रारंभ विधान परिषदेच्या माध्यमातून झाला होता. त्यानंतर दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघांतून त्या लोकसभेवर निवडून गेल्या. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांनी बलाढ्य नेते मुरली देवरा यांना आव्हान दिले होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. संपूर्ण देशात जलविद्युत, तसेच अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून वीजनिर्मिती करण्याच्या कामाला त्यांनी गती दिली.

Web Title: Former Union minister Jayawantiben Mehta passes away