किल्ल्यांवर सायकल सफर 

किल्ल्यांवर सायकल सफर 

ठाणे - महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास सांगणाऱ्या गडदुर्गांवर जाऊन तेथील परिसरात आणि गावकऱ्यांसह नव्या वर्षाचे स्वागत करण्याची 16 वर्षांची परंपरा कल्याणच्या दुर्गप्रेमींनी यंदाही राखली आहे. 

पेट्रोल-डिझेलची महागाई आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी सायकलवरून गड, किल्ले फिरण्याची परंपरा कल्याणच्या दुर्गप्रेमींनी सुरू केली आहे. 

दुर्गप्रेमी सुशांत करंदीकर यांनी रत्नागिरी परिसरातील सुमारे 230 किलोमीटरचा सायकल प्रवास करत परिसरातील आठ किल्ल्यांचे दर्शन घेतले. रत्नदुर्ग, पूर्णगड, आंबुळगड, यशवंतगड, विजयदुर्ग, देवगड, भगवंत गड आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांना भेट देऊन त्यांनी नव्या वर्षाचे स्वागत केले. नव्या वर्षात प्रवेश करताना आनंदाबरोबरच संघर्ष आणि साहसाची भावना निर्माण होण्यासाठी हा उपक्रम या दुर्गप्रेमींकडून केला जात आहे. हा अनुभव वर्षभरासाठी आत्मविश्वास देत असल्याची भावना करंदीकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

नववर्षाच्या पहिल्या दिवशी गडदुर्गांना भेट देऊन त्या भागातील नागरिकांमध्ये राहण्याचा या मंडळींचा प्रयत्न असतो. 16 वर्षांपासून सुरू झालेल्या या परंपरेत खंड पडला नाही. आत्तापर्यंत सुमारे 28 ते 30 जणांनी या मोहिमांमध्ये सहभाग घेतला असला, तरी यंदा जवळपास सर्व सहकारी कामामध्ये गुंतल्यामुळे ही परंपरा राखण्याची जबाबदारी सुशांत यांच्यावर आली. त्यांनी एकट्यानेच हा प्रवास पूर्ण केला. सायकल हे पर्यावरणस्नेही वाहन असून ते कोठेही सहज नेता येते. रस्ता असेल तर सायकलवर बसून प्रवास करता येतो. डोंगराची चढण असेल, तर सायकल खांद्यावर घेऊन खाली उतरून मग पुढचा प्रवास करता येतो. त्यामुळे सायकल या प्रवासात सहप्रवासी बनूनच सोबत प्रवास करते. माऊंट सायकलिंगचा प्रसार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असल्याचे करंदीकर सांगतात. 

असा आला अनुभव 
वाटेत भेटणारी गावे, माणसे यांच्याशी संवाद साधत या गोष्टींचा प्रचार करण्याबरोबरच नव्या वर्षाचा आनंदही साजरा करता येतो. या मोहिमेदरम्यान अत्यंत चांगले नागरिक आणि पर्यटक करंदीकर यांना भेटले. त्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. 

असा झाला प्रवास 
अत्यंत कमी जीवनावश्‍यक वस्तू आणि शिधा सोबत घेऊन मिळेल तेथे राहण्याची तयारी करून त्यांनी ही मोहीम पूर्ण केली. जगण्याचा वेगळा अनुभव या निमित्ताने मिळाला असून, वर्षभरासाठी यातून चांगली प्रेरणा मिळत असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com