गारमेंट कंपनीची ऑनलाइन फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मुंबई : येथील एका गारमेंट कंपनीचा बनावट ई-मेल आयडी तयार करून या कंपनीच्या दोन ग्राहक कंपन्यांकडून येणे असलेल्या 35 लाख रुपयांवर डल्ला मारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई : येथील एका गारमेंट कंपनीचा बनावट ई-मेल आयडी तयार करून या कंपनीच्या दोन ग्राहक कंपन्यांकडून येणे असलेल्या 35 लाख रुपयांवर डल्ला मारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ही रक्कम मुंबईऐवजी ब्रिटनमधील एका बॅंक खात्यात जमा करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दक्षिण मुंबईतील ही कंपनी विदेशात कपडे निर्यात करते. त्या कंपन्या मालाची किंमत संबंधित कंपनीच्या बॅंक खात्यात जमा करतात. आरोपींनी या कंपनीच्या ई-मेलशी साधर्म्य सांगणारा ई-मेल आयडी तयार केला. त्यामुळे विदेशी कंपन्यांना या बनावट ई-मेल आयडीविषयी संशय आला नाही.

आरोपींनी आपण तयार केलेल्या बनावट ई-मेलवरून विदेशी कंपन्यांशी संपर्क साधला आणि कंपनीचे भारतातील बॅंक खाते ब्लॉक झाले असल्यामुळे ब्रिटनमधील एका खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. या कंपन्यांनी पाउंड आणि अमेरिकन डॉलरच्या स्वरूपात 35 लाख रुपये जमा केले. हे व्यवहार 27 मार्च ते 31 मार्चदरम्यान झाले. या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर कंपनीने मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार केली. या फसवणुकीच्या तपासासाठी सायबर पोलिसांची मदत घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Web Title: garment companies deceived online