सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मार्च 2017

दरात वाढ न झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण
मुंबई - सोने-चांदीचे स्थिरावलेले दर आणि आगामी लग्नसराईचा हंगाम लक्षात घेत ग्राहकांनी दागिन्यांच्या खरेदीसाठी मंगळवारी पाडव्याचा मुहूर्त साधला. झवेरी बाजार, गिरगाव, दादर, ठाणे येथील प्रमुख सराफा पेढ्यांवर ग्राहकांनी गर्दी केली होती.

दरात वाढ न झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण
मुंबई - सोने-चांदीचे स्थिरावलेले दर आणि आगामी लग्नसराईचा हंगाम लक्षात घेत ग्राहकांनी दागिन्यांच्या खरेदीसाठी मंगळवारी पाडव्याचा मुहूर्त साधला. झवेरी बाजार, गिरगाव, दादर, ठाणे येथील प्रमुख सराफा पेढ्यांवर ग्राहकांनी गर्दी केली होती.

सराफा बाजारात सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 28 हजार 900 रुपये होता. 28 कॅरेटसाठी 28 हजार 200 ते 500 रुपयांच्या दरम्यान होता. चांदीचा भाव किलोला 42 हजारांच्या आसपास होता. मुहूर्ताला दागिने खरेदीची परंपरा आजही कायम आहे. कितीही अडचणी आल्या तरी ग्राहक शुभकार्यासाठी मुहूर्ताला सोने खरेदी करतो हे बाजारातील उत्साही वातावरणाने स्पष्ट केले. बदलत्या फॅशनप्रमाणे ग्राहकांचा कलही हळूहळू बदलत आहे. दररोज वापरण्यासाठी हलक्‍या वजनाच्या फॅशनेबल ज्वेलरीला ग्राहकांकडून जास्त मागणी असल्याचे पांडुरंग हरी वैद्य या मुंबईतील जुन्या सराफ पेढीच्या प्रमुख संपदा वैद्य यांनी सांगितले. हलक्‍या वजनाची ज्वेलरी पाच ते 10 हजारांच्या दरम्यान आहे. हिरे लावलेल्या दागिन्यांना तरुणांची विशेष पसंती असून, असे दागिने 15 हजारांपासून मिळत असल्याचे वैद्य यांनी सांगितले.

सोने-चांदीच्या दरात वाढ न झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. डायमंड ज्वेलरीची क्रेझ दिवसागणिक वाढत असल्याचे "फॉरेव्हर मार्क इंडिया'चे अध्यक्ष सचिन जैन यांनी सांगितले. फॉरेव्हर मार्कच्या दागिन्यांसाठी जगभरातील केवळ एक टक्का हिरे पात्र ठरतात. यावरून या दागिन्यांचा दर्जा दिसून येतो, असे जैन यांनी सांगितले.

गेल्या वर्षी सराफांच्या संपामुळे पाडव्याला दुकाने बंद होती. त्यामुळे ग्राहकांना पाडव्याची खरेदी करता आली नव्हती. आता सोने-चांदीच्या किमती स्थिर आहेत. त्याशिवाय खरेदीसाठी पूरक वातावरण असल्याचे ठाण्यातील राजवंत ज्वेलर्सचे प्रमुख सुरेश जैन यांनी सांगितले.

ज्यांच्याकडे वर्षभरात विवाहयोग आहेत असे ग्राहक लग्नाच्या खरेदीसाठी पाडव्याला आवर्जून नव्या डिझाईन्सची बुकिंग करण्यासाठी येतात, असे जैन यांनी सांगितले. दोन ते पाच ग्रॅम वजनाची चोख सोन्याची कॉइन्स, अंगठी, रिंग, वळी, लगड आदी वस्तूंना चांगली मागणी होती.

महिनाअखेरीचा फटका
महिनाअखेरीचा परिणाम काही प्रमाणात जाणवल्याचे काही सराफांनी सांगितले. विशेषत: नोकरदार वर्गाला पगाराअभावी खरेदी करता आली नाही. त्यामुळे विक्रीवर परिणाम झाला.

Web Title: gold purchasing padava muhurt