अंगठ्यावर नको शाई, नाव लिवणार आज्जीबाई! 

अंगठ्यावर नको शाई, नाव लिवणार आज्जीबाई! 

फांगणे - "ब्यांकेत जायाचो तवा तिथला सायेब आमच्या आंगठ्याला शाई लावायचा आणि आम्ही आंगठा कागदावर उठवायचो... आता आमाला नाव लिवता येतं... नाव लिवायला लागल्यावर पयल्यांदा ब्यांकेत गेलो तवा तिथल्या सायबाला आम्ही टेचात बोललो, आमाला शाई नको आमी आता सोताचं नाव लिवणार... ह्ये ऐकून तो गपगारच झाला', हा किस्सा सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होते. आज्जीबाईंच्या शाळेत शिकणाऱ्या गुलाबआज्जी, निर्मलाआज्जींच्या डोळ्यात एक खट्याळपणाही दिसत होता. आयुष्याच्या संध्याकाळी जिथे निरवानिरवीची भाषा केली जाते, तिथे या आज्जीबाई कमालीच्या आत्मविश्‍वासाने बोलत होत्या. हा आत्मविश्‍वास आला होता तो केवळ शाळेमुळे. स्वतःचे नाव लिहिता येऊ लागल्यामुळे. 

शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचल्यामुळे महिला साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे; पण ज्यांचे वय पुढे निघून गेले आणि शिक्षणाची गंगा मागून आली. अशा अनेक ज्येष्ठ नागरिकांना अक्षरओळख झाली नाही. अशा साठी पार केलेल्या पिढीला साक्षर बनवण्याचा संकल्प मुरबाडजवळील नाणेघाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगणे गावातील ग्रामस्थांनी केला. त्यातूनच सुरू झाली ही आज्जीबाईंची शाळा. गेल्या वर्षी जागतिक महिला दिनी इथल्या गावकऱ्यांनी आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी आज्जीबाईंना थेट शाळा शिक्षणाचीच भेट दिली आणि सुरू झाली आजीबाईंची शाळा. 

मुरबाड तालुक्‍यातील माळशेज आणि नाणेघाटाच्या मधे वसलेल्या फांगणे गावातील आज्जीबाईंचे आयुष्य चूल, मूल, घरदार, शेतीभोवतीच फिरत होते. बाहेरच्या जगात काय चालले आहे याची माहितीच त्यांना नव्हती; पण या शाळेच्या निमित्ताने त्यांना नव्या जगाची दारे खुली झाली आहेत. या शाळेच्या माध्यमातून त्यांनी एका नव्या विश्‍वात पाऊल टाकले आहे. हे विश्‍व त्यांसाठी खूप वेगळे आहे. या विश्‍वात येऊन त्यांना स्वतःची तर ओळख झालीच; पण त्यांच्यात आत्मविश्‍वासही निर्माण झाला आहे. त्यांचा हा आत्मविश्‍वास त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी सक्षम बनवत आहे. 

नव्वद वर्षे वयाच्या सीताआज्जी दररोज मोठ्या उत्साहाने शाळेत येतात. नजर थोडी कमजोर झाली असली तरी त्यांच्यातील शिकण्याची जिद्द, आवड कौतुकास्पद आहे. घरी सराव करताना कधी चुकले तर आठ वर्षांची नात माझा हात धरून शिकवते. एक नवे आयुष्य या शाळेमुळे मिळाले हे सांगत असताना सीताआज्जींच्या डोळ्यात पाणी तरळते. इतकी वर्षे शिक्षणापासून दूर राहिलो; पण आता सरत्या आयुष्यात का होईना हातात पाटी-पेन्सील आली याचे खूप समाधान वाटते अशी भावना निर्मलाआज्जी, यशोदाआजी, हौसाआजी, अनसूयाआज्जी व्यक्त करतात. शाळेत आल्यामुळे आपणही शिकू शकतो, याचा आत्मविश्‍वास आला. पाटीवर अक्षरे लिहिताना खूप मजा येते. आयुष्यात कधी पेपरमध्ये फोटो आला नसता; पण या शाळेमुळे ही किमया तर साधलीच; शिवाय टीव्हीवरही आमची शाळा दाखवली जात असल्याचा आनंद वाटतो. 

"सकाळ'चे मानले आभार 
"सकाळ'ने सर्वप्रथम या शाळेची चांगली बातमी दिली व त्याचे सर्वत्र कौतुक झाले. आता इतर निरक्षर लोक यातून प्रेरणा घेत शिक्षणासाठी पुढे येतील, असेही मत योगेंद्र बांगर यांनी व्यक्त केले. 

शाळेच्या अगदी पहिल्या दिवसापासून गावातील प्रत्येक आजी उत्साहाने शाळेत येते आणि अक्षरे गिरवते. शिक्षण घेण्याबरोबरच या साऱ्याजणी एकत्र येत असल्याने त्यांचा वेळ आनंदात तर जातोच; पण एकमेकींची सुख-दुःखं त्यांना वाटता येतात. त्यामुळे मनातील किल्मिषे दूर झाली आहेत. इतकेच नाही तर गृहकलहदेखील गेल्या वर्षभरात संपुष्टात आले आहेत. 
- योगेंद्र बांगर, जिल्हा परिषद शिक्षक 

शाळेतील सर्वच आजीबाईंचा उत्साह पाहून माझी जबाबदारी वाढली आहे. मुळाक्षरांचा सराव सुरू आहे. लवकरच सर्वांना जोडाक्षरे लिहिण्याचा सराव घेणार आहे. माझ्या सासूबाईही या शाळेत शिकतात. माझे पती प्रकाश मोरे यांनीच जागा दिल्यामुळे ही शाळा नव्या जागेत सुरू झाली. "सकाळ'मुळे आमचे गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्याचा खूप अभिमान वाटतो. 
- शीतल मोरे, शिक्षिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com