विद्यापीठातून उडणार हेलिकॉप्टर!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई - आरे वसाहतीतील हेलिकॉप्टर दुर्घटनेची घटना ताजी असतानाच मुंबई विद्यापीठ आणि पवनहंस प्रा. लि.ने विद्यार्थ्यांना गुढीपाडव्यापासून हेलिकॉप्टरमधून "मुंबई दर्शन' घडवण्याची तयारी केली आहे. बाजारभावापेक्षा 10 टक्के सवलतीने ही सेवा कालिना संकुलातून सुरू होईल. शिक्षणाभिमुखतेकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा हा फंडा चर्चेचा विषय ठरला आहे.

विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशनमध्ये 2016-17 पासून द्विपदवी अभ्यासक्रम सुरू होत आहे. गुरुवारी गरवारे इन्स्टिट्यूट आणि पवनहंस यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार विद्यापीठातर्फे "बीएस्सी एरॉनॉटिक्‍स' आणि पवनहंसतर्फे "एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनिअरिंग' ही पदवी देण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील विद्यानगरी संकुलातील अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, पवनहंसचे अध्यक्ष डॉ. बी. पी. शर्मा, एअर कमांडर टी. ए. दयासागर आणि गरवारे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अनिल कर्णिक उपस्थित होते.

या अभ्यासक्रमाची घोषणा होताच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात हेलिकॉप्टरमधून "मुंबई दर्शन' घडवण्याचा उपक्रम हा चर्चेचा विषय ठरला. विद्यापीठाच्या परिसरात हेलीपॅड आहे.

मुंबई विद्यापीठातील काही संस्था "बीएस्सी एरॉनॉटिक्‍स' हा अभ्यासक्रम शिकवतात. आता याला कौशल्यावर आधारित शिक्षणाची जोड देण्यासाठी पवनहंस हेलिकॉप्टर इन्स्टिट्यूटने पुढाकार घेऊन गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन संस्थेसोबत सामंजस्य करार करून या द्विपदवी अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे.

साठ जणांना मिळणार प्रवेश
या अभ्यासक्रमासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित) विद्यार्थी पात्र ठरतील. या अभ्यासक्रमाला 60 जणांना प्रवेश मिळेल. हा तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे.

Web Title: helicopter started in university